प्रवरेत कौशल्यविकास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था सुरू करणार : ना.विखे

0
बाभळेश्‍वर येथे कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत तंत्रज्ञान महोत्सव 2018 चे उद्घाटन करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील. समवेत झेडपी अध्यक्षा शालिनीताई विखे, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, बापूसाहेब आहेर, मुकुंदराव सदाफळ, डॉ. सर्जेराव निमसे, कैलास तांबे, बबलू म्हस्के, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजी नालकर, डॉ. बाबासाहेब गोरे, संजय आहेर, नाबार्डचे शीलकुमार जगताप, अमोल थेटे आदी.

प्रवरा सेवक पतसंस्थेला 1 कोटी 46 लाखांचा नफा; 14 टक्के डिव्हिडंड देणार

लोणी (वार्ताहर)- प्रवरा शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी जगात अनेक देशांमध्ये विविध क्षेत्रांत उच्च पदावर कार्यरत आहेत.सध्या शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणणार असून प्रवरेत कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी नवीन दोन संस्था सुरू करणार असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. दरम्यान प्रवरा सेवक पतसंस्थेला अहवाल सालात सुमारे 1 कोटी 46 लाखांचा नफा झाला असून सभासदांना 14 टक्के डिव्हिडंड देणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नवनाथ विखे यांनी दिली.

प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटी सेवकांची सहकारी पतसंस्था लोणीची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा विखे पाटील महाविद्यालयाच्या खा. बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेला शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक डॉ. हरिभाऊ आहेर, पतसंस्थेचे अध्यक्ष नवनाथ विखे, उपाध्यक्ष सुधाकर गोरे, प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, प्राचार्य डॉ. सलालकर, शिक्षणाधिकारी प्रा. विजय आहेर, डॉ. रेठरेकर, विखे कारखान्याचे संचालक प्रा. राजेंद्र घोलप आदी उपस्थित होते.

ना.विखे पाटील यावेळी म्हणाले, प्रवरा शिक्षण संस्थेचे 94 हजार माजी विद्यार्थी आहेत. सिन्नर आणि विळदघाट येथूनही 45 हजार विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. संस्थेच्या विविध शाखांचे माजी विद्यार्थी जगातील अनेक देशांत वेगवेगळ्या क्षेत्रांत उच्च पदावर कार्यरत आहेत. वेगाने प्रगती करणार्‍या कझाकिस्तानच्या पंतप्रधानांचा मुख्य सल्लागार प्रवरेचा माजी विद्यार्थी आहे. अमेरिकेतील मोठ्या कंपनीचा उपाध्यक्षही माजी विद्यार्थी आहे. डीआरडीएचा प्रमुखही आहे. संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ या गावातील प्रवरेचा माजी विद्यार्थी ओरॅकल या सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीचा उपाध्यक्ष आहे. अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर काम करीत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा सध्या शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांना प्रवरेत निमंत्रित करून संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

प्रवरेतील विद्यार्थी बदलत्या काळात मागे राहू नये म्हणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी संस्थेमार्फत केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या परिसरातील स्पर्धा परीक्षेत यश मिळवून सध्या कार्यरत असणार्‍या अधिकार्‍यांना निमंत्रित करून त्यांचा सल्ला व मार्गदर्शन मिळावे म्हणून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.त्यासाठी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पिटीटीव्ह स्टडीज ही नवीन संस्था सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कौशल्य विकासासाठी प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट ही संस्था लगेच सुरु करणार आहोत. भारत फॉर्ब्ज या नामांकित कंपनीचे मालक बाबा कल्याणी यांनी या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. संस्थेचा गुणवत्ता सुधारावर सर्वाधिक भर असून पालकांनीही अधिक लक्ष देण्याची गरज आहे. प्रवरा सेवक पतसंस्थेचा कारभार उत्तम असून संस्थेकडून चांगल्या सेवा आणि योजना सभासदांसाठी सुरू करून संचालक मंडळाने विश्‍वास संपादन केल्याबद्दल त्यांच्या कामाचे कौतुकही त्यांनी केले.

अध्यक्ष नवनाथ विखे यांनी संस्थेची माहिती देताना सांगितले, संस्थेचे भागभांडवल 11 कोटी 99 लाखांचे असून 18 कोटींच्या ठेवी, 34 कोटींचे कर्जवाटप, 8 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. सध्या कर्जाचा व्याजदर बारा टक्के असून तो आता अकरा टक्के करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. 1 कोटी 46 लाखांचा नफा झाल्याने सभासदांना 14 टक्के डिव्हिडंड देणार असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष सुधाकर गोरे यांनी सभासदांच्या मुलींच्या विवाहासाठी कन्यादान योजनेतून 11 हजार रुपये देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. कर्ज मर्यादा बारा लाखांहून वाढवून पंधरा लाख करण्यात आली आहे.

कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत मयत सभासदांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात येत असून सभासदांना एसएमएस सेवेद्वारे माहिती दिली जात आहे. पारदर्शक व काटकसरीच्या कारभाराद्वारे सभासदांचे हित जोपासण्यात येत अल्याचे सांगितले. सचिव बबन म्हसे यांनी नोटिशीचे वाचन केले. गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचारी सभासदांचा ना. विखे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. निसार पटेल व प्रा. नामदेव तांबे यांनी सूत्रसंचालन केले. नानासाहेब तळेकर, भानुदास खर्डे, रामदास ब्राम्हणे, सौ. मीरा काकडे, प्रा. अरुण वराट, संजय जोशी, प्रा. मुश्ताक शेख, गणेश गीते, सौ. गौरी आहेर आदींसह सभासद या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*