Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कळवण : तीन तासांच्या अथक प्रयत्नाअंती सहा वर्षीय मुलाला बोअरवेलमधून वाचविण्यात यश

Share

नाशिक | प्रतिनिधी 

कळवण तालुक्यातील बेज गावात सहा वर्षीय मुलगा ३०० फुट बोअरवेलमध्ये पडल्याची घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. घटनेची माहिती कळवण उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळताच घटनास्थळी पोकलंड, जेसीबीच्या सहाय्याने बचावकार्य राबविण्यात आले. स्थानिकांच्या मदतीने तीन तासांच्या अथक प्रयत्नाअंती या मुलास सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

घटनेची अधिक माहिती अशी की, कळवण तालुक्यात मध्यप्रदेशमधून काही कुटुंबं मोलमजुरीसाठी आले आहेत. मका कापणी सुरु असताना या नेहाल जवानसिंग सोळंकी हा सहा वर्षांचा मुलगा शेतातील बोअरवेलमध्ये पडला. या घटनेची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी पोलीस पाटील तसेच कळवण तहसीलदर आणि, उपविभागीय अधिकाऱ्यांना माहिती दिली.

घटनेची गांभीर्यता  लक्षात घेत सर्व अधिकारी हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जेसीबी आणि पोकलंडने जवळपास दहा फुट खोल खड्डा आजूबाजूला खोदण्यात आला. मुलाचा आवाज येत होता; तसेच त्याला आपण काय बोलतो आहोत हेदेखील त्याला समजत होते.

यानंतर त्याला ऑक्सिजन मिळावा यासाठी सरकारी दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यवस्था केली. मुलगा अधिक खोल नसून तो ५० ते ६० फुटावर अडकल्याचे निदर्शनास आले.

यानंतर एका दोरखंडाच्या सहाय्याने या मुलास वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. जवळपास तीन तास बचावकार्य सुरु होते. मुलाला दोरखंड बांधून गाठ बांधायला सांगितली.  अखेर मुलाने गाठ बांधली, यानंतर मुलाला हळूहळू वरती ओढण्यात आले. अखेर या मुलास सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मुलाला बाहेर काढल्यानंतर अनेकांना अश्रू अनावर झाले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या मुलावर उपचार करून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

प्रारंभी, कळवण उपविभागीय अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलास(एनडीआरएफ) पाचारण केले होते. पथक कळवणच्या दिशेने यायला लागले असताना स्थानिक नागरिकांचे बचावकार्य यशस्वी झाल्याने एनडीआरएफची टीम माघारी धाडण्यात आली. दरम्यान, प्रशासनाच्या अतिशीघ्र कारवाई आणि प्रसंगावधानाने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

घटनास्थळी आमदार नितिन पवार, माजी जि प सभापती रवींद्र देवरे, महसूल व पोलीस यंत्रणेचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ पंकज आशिया, तहसीलदार बी एन कापसे, पोलीस निरीक्षक, आरोग्य यंत्रणेचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ काटे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत पाटील व डॉ जगदीश जाधव याचे पथकातील कर्मचारी घटनास्थळी मदत केली.

सध्या नेहाल जवानसिंग सोळंकी (वय ६) हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल असून तेथे प्रशासकीय अधिकारी डॉ गिरीश देवरे यांचे देखरेखीखाली आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ विलास चव्हाण परिचारिका भारती अहिरे उपचार करीत आहेत. तसेच बालरोग तज्ज्ञ दीपक बहिरम, भीषक डॉ प्रल्हाद चव्हाण यांचे विशेष पथक दाखल आहे. बालकाची प्रकृती स्थिर असलायचे माहिती देण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!