Thursday, April 25, 2024
Homeनाशिकवावी येथे उद्यापासून आठवडाभर ‘जनता कर्फ्यू’; करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांचा निर्णय

वावी येथे उद्यापासून आठवडाभर ‘जनता कर्फ्यू’; करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांचा निर्णय

वावी | वार्ताहर

करोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र जनजीवन भयभीत झाले आहे. मात्र, असे असताना स्थानिक व्यावसायिकांकडून पुरेशी खबरदारी न घेता बिनदिक्कतपणे आपले व्यवहार सुरू ठेवण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. याबाबत वारंवार सूचना करून देखील दक्षता घेतली जात नसल्याने उद्या मंगळवार ( दि.19) पासून सलग सात दिवस वावी गावात जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांच्या उपस्थिती ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील युवक व व्यावसायिकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

जनता कर्फ्यू दरम्यान गावातील एकही नागरिक अनावश्‍यक रित्या घराबाहेर पडणार नाही. सकाळी आठ वाजेपर्यंत दूध संकलन केंद्रे बंद केली जातील. याशिवाय, आठवडे बाजार, किराणा दुकाने, भाजीपाला विक्री, पीठ गिरणी देखील बंद ठेवण्यात येणार आहे.

केवळ आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवांशी निगडित आस्थापना सुरू राहतील असे ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांनी घोषित केले आहे. शासनाने चौथा लॉक डाऊन जाहीर केला आहे.

याचा अर्थ परिस्थिती नियंत्रणात असली तरी गंभीर आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे अनावश्यकरित्या घराबाहेर पडणे प्रत्येकाने स्वतःहून टाळले पाहिजे.

ग्रामपंचायत क्षेत्रात तोंडाला मास्क, रुमाल न बांधता फिरणाऱ्यांवर शंभर रुपये दंड व संचारबंदी भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा जाधव यांनी ग्रामस्थ व व्यावसायिकांना दिला आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, व्यापारी संघटना प्रतिनिधी, आरोग्य सेवक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत येत्या संपूर्ण आठवडा गावातील सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेऊन जनता कर्फ्यू यशस्वी करावा, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी केले आहे.

गावाबाहेर विलीगिकरण केंद्र करणार

वावी गावात परजिल्ह्यातून, परराज्यातून परवानगी व विनापरवानगी येणाऱ्यांना सक्तीने क्वॉरेन्टाईन राहावे लागणार असल्याचे ठरले. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून नियोजन करण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या शाळेत विलीगिकरण केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. याठिकाणी बाहेर गावाहून येणाऱ्यांना किमान आठ दिवस क्वॉरेन्टाईन राहावे असे आवाहन करण्यात आले.

या संबंधीत कुटुंबांनी जेवणाचे डबे पुरवावेत अशी सूचना जाधव यांनी केली. गावातील व्यावसायिकांसाठी जनता कर्फ्यू संपल्यानंतर सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत किराणा व शासनाने सूचित केलेली दुकाने उघडी राहतील. ही वेळ न पाळणाऱ्यांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचा इशारा ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या