Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ठाणगाव ३६ तासांपासून अंधारात; पूर्वमोसमी पावसामुळे विजेची बत्ती गुल

Share

सिन्नर (अजित देसाई) | पावसाळ्याच्या तोंडावर महावितरणच्या गलथान नियोजनाचा फटका सिन्नर तालुक्यातील जनतेला बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून वादळ व विजांच्या संकटाला तोंड द्यायला महावितरणच्या यंत्रणा अपयशी ठरली आहे.

तालुक्यातील ठाणगाव परिसरात रविवारच्या पावसाने खंडित झालेला वीजपुरवठा 36 तास उलटले तरी बंद असून सोमवारी झालेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सायंकाळी 7 वाजेपासून सिन्नर शहरासह निम्मा तालुका रात्रभर अंधारात राहिला आहे.

पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली गेली नसल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जनतेला त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.

ठाणगाव फिडरवर झालेला बिघाड 36 तास उलटून देखील दुरुस्त होत नसल्याने महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तर सिन्नर शहराच्या विविध भागात देखील सोमवारी सायंकाळी आलेल्या अर्धा तास पावसाने महावितरणच्या यंत्रणेला धक्का दिला. रात्र उलटली तरी देखील हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले नाही.

हाच प्रकार वावी, नांदूर शिंगोटे, पाथरे परिसरातील जनतेला अनुभवायला मिळाला. वरील तिनही उपकेंद्रांमधून होणारा वीजपुरवठा सोमवारी सायंकाळ पासून खंडित झाला होता.

ठाणगाव येथील फिडरवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वीजपुरवठा बंद ठेवला असल्याचे उत्तर अधिकारी देत होते. रात्री उशिरापर्यंत ठाणगाव येथील बिघाड दुरुस्त झाला नसल्याने निम्म्या तालुक्यातील जनतेला रात्र अंधारात काढावी लागली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!