Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : पिकांचे पंचनामे सुरू असताना पास्तेत ग्रामसेवकास मारहाण

Share

सिन्नर । पिकांचे पंचनामे सुरू असताना पंचनामा करणार्‍या ग्रामसेवकालाच मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी 2.30 च्या दरम्यान तालुक्यातील पास्ते येथे घडली.

ग्रामसेवक जयवंत साखरे हे मारुती मुरलीधर घुगे, बाळू काशीनाथ घुगे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करुन पास्ते-जामगाव रस्त्यावर शेतकर्‍यांशी नुकसानीबाबत चर्चा करीत असतांना अशोक विष्णू घुगे रा. पास्ते यांनी उर्मट भाषेत अरेरावी करीत साखरे यांना धक्काबुक्की केली व हाताने मारहाण केली.

सदर घटनेची माहीती तातडीने गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तहसिलदार राहुल कोताडे यांना देण्यात आली. ग्र्रामसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने तहसिलदारांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली व शासकीय काम करतांना झालेल्या मारहाणीकडे लक्ष वेधत संबधितांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. त्यांनतर संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना भेटून त्यांनाही झालेल्या प्रकाराबाबत माहीती दिली.

पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याबाबत या दोघांनी मार्गदर्शन केल्यानंतर सिन्नर पोलीस ठाण्यात जाऊन घुगे यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी फिर्याद दाखल करुन घेतली व साखरे यांना वैद्यकीय तपासणीसाठी दोडीच्या ग्रामिण रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास पोलीस निरिक्षक पाटील हे करीत आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करताना घडलेल्या या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.

रात्री उशिरा गुन्हा दाखल
सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी त्वरीत साखरे यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांशी बोलून गुन्हा दाखल करण्याबाबत सुचना केली. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे, सरचिटणीस रविंद्र शेलार, कृषी अधिकारी पवार यांनी साखरे यांची भेट घेऊन त्यांना धिर दिला व त्यानंतर सिन्नर पोलीस ठाण्यात जाऊन रात्री 11.55 वाजता घुगे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

घटना निषेधार्ह
झालेली घटना ही निषेधार्ह आहे. त्या आरोपीबाबत कडक अशी कार्यवाही करणेकरीता पाठपुरावा करण्यात येईल. आरोपीस त्वरीत अटक व्हावी यासाठी उद्या सकाळी 10.30 वाजता मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे. माञ, या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे पिकांची अपरिमित हानी झालेली असल्याने त्यांचे पंचनामे करण्याचे काम नेमणुक केलेल्या सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकार्‍यांंनी करावे.
कैलास वाघचौरे, जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!