Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

‘तुमच्या कुत्र्यांनी कोंबड्या खाल्ल्या’ विचारणे बेतले जीवावर; हिवरेतील शेतकरी दाम्पत्यास मारहाण

Share

सिन्नर । वार्ताहर

पाळीव कुत्र्यांनी कोंबड्या खाल्ल्या असे विचारल्याचा राग येऊन गेल्या महिन्यात (दि. २३) रोजी तालुक्यातील हिवरे येथील भीमा केरू बिन्नर व अनुसया केरू बिन्नर या शेतकरी दांपत्याला जबर मारहाण केल्याची घटना घडली  आहे. या मारहाणीनंतर सदर शेतकरी दांपत्य नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात सुमारे १३ दिवस उपचार घेत होते.
बिन्नर दांपत्य हिवरे येथे मुलगा संतोष व मुलगी ललिता यांच्यासमवेत वास्तव्यास आहेत. शेतात वस्ती करून ते राहत असून जोडव्यवसाय म्हणून त्यांनी कोंबड्या पाळलेल्या आहेत. दिवसभर घराच्या परिसरात व शेतात फिरून या कोंबड्यांचे उदरभरण होते. गेल्या २४ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास भीमा व अनुसया बिन्नर हे शेतातील विहिरीचे काम करीत असताना कोंबड्यांच्या ओरडण्याचा व कुत्र्यांच्या भुंकण्याचा मोठा आवाज आला.

त्यामुळे दोघेही जवळच असलेल्या घराकडे पळत गेले असता २-३ कुत्र्यांनी झडप घालून २-३ कोंबड्याना ठार मारल्याचे आढळून आले. याबाबत बिन्नर यांनी शेजारच्या वस्तीवरील भास्कर शंकर ढोन्नर यांना तुमच्या पाळलेल्या कुत्र्यांनी आमच्या कोंबड्या ठार मारून नुकसान केले असल्याचे सांगितले.

मात्र, याचा राग येऊन ढोन्नर यांनी दोघांनाही शिवीगाळ करून लोखंडी गजाच्या सहाय्याने मारहाण केली. या मारहाणीत भीमा बिन्नर यांच्या डोक्याला व डाव्या हाताला गंभीर  इजा झाली. तर  अनुसया यांच्या डोक्याला व हाताला मोठी दुखापत झाली. बिन्नर यांचे मित्र लक्ष्मण गोडे (सोमठाण) यांनी या मारहाणीला विरोध करून भाडणं सोडवले व दोघांना सिन्नर पोलिस ठाण्यात आणले होते.
तेथे त्यांची जखमी अवस्था पाहून पोलिसांनी उपचारासाठी नगरपालिका दवाखान्यात जाण्यास सांगितले. मात्र दोघानांही तेथील डॉक्टरांनी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे जवळपास १३ दिवस हे शेतकरी दांपत्य उपचार घेत होते. या मारहाण प्रकरणी सिन्नर पोलिसठाण्यात भास्कर ढोन्नर याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसात तक्रार केली म्हणून पुन्हा शिवीगाळ… 
महिनाभरापूर्वी  गुन्हा दाखल करूनही सिन्नर पोलिसांकडून संशयित आरोपी ढोन्नर यांचेविरोधात कारवाई करण्यात आली नव्हती कदाचित लोकसभा निवडणुकीचा ताण असल्याने पोलिसांकडून या प्रकरणी कारवाई करायला उशीर झाला असावा. अखेर दोन दिवसांपूर्वी ढोन्नर यास पोलिसांनी बोलावणे केली. चौकशीसाठी दिवसभर पोलिसठाण्यात बसवून ठेवण्यात आले यापलीकडे कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून करण्यात आली नाही असे समजते.
मात्र, तेथून सायंकाळी उशिरा गावी गेल्यावर माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार का केली असे विचारत ढोन्नर याने बिन्नर यांच्या घरी जाऊन एकट्या असणाऱ्या अनुसया बिन्नर यांना अर्वाच्य शिवीगाळ केली. कुठेही तक्रारी केल्या तरी पोलीस माझे काही करून शकत नाही असा दम देखील त्याने भरला. याबाबत अनुसया बिन्नर या आज दि.२५ सकाळी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या असता पोलिसांकडून दुजाभावाची वागणूक देण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोलीस ठाण्यात २-३ तास त्यांना बसवून ठेवण्यात आले. तेथे  उपस्थित जबाबदार अधिकाऱ्याने देखील आपले म्हणणे एकूण घेतली नाही व सध्या कागदावर तक्रार लिहून घेत बोळवण करण्यात आली.
पोलीस अधिक्षकांकडे दाद  मागणार 
पतीसह आपल्यावर जीवघेणा हल्ला झाला. मात्र एक दिवस ठाण्यात बसवून ठेवण्यापलीकडे पोलिसांकडून संशयिताविरोधात कारवाई केली जात नाही. माझ्याविरुद्ध गुन्हा का दाखल केला म्हणून संशयित पुन्हा घरी येउन शिवीगाळ करतो. महिला म्हणून मी व आमचे संपूर्ण कुटुंब या प्रकारामुळे दहशतीखाली आले आहे. स्थानिक पातळीवर पोलिसांकडून कारवाई करायला टाळाटाळ होत आहे. पुढील दोन दिवसांत योग्य ती कारवाई न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार असून त्यांच्याकडेच दाद मागणार असल्याचे अनुसया बिन्नर यांनी सांगितले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!