Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘समृद्धी’च्या नावाने चांगभलं; सिन्नरला माफियांचे फावले; ठेकेदाराच्या नावाखाली वाळूची चोरटी वाहतूक

Share

नाशिक | प्रतिनिधी 

मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी गौण खनिज उपलब्ध करून देताना ठेकेदारांना स्थानिक नदी नाल्यांसह बंधारे व धरणांमध्ये खोदकाम करण्यास शासनाने विशेष परवानगी दिली आहे. या खोदकामामुळे वर्षानुवर्षे दुर्लक्षित असणाऱ्या ग्रामीण भागातील जलस्र्रोतांना बळकटी मिळणार आहे.
असे असे तरी शासनाच्या या धोरणाचा पद्धतशीर फायदा वाळूमाफियांनी उचलला असल्याचे चित्र सिन्नर तालुक्यात बघायला मिळते आहे. समृद्धी साठी नियुक्त ठेकेदाराच्या आडून नदीपात्रांमध्ये खोदकाम करणाऱ्या कथित माफियांना प्रशासकीय यंत्रणांनी आवर घालावा अशी मागणी करण्यात येत आहे.
वाळूच्या गोरखधंद्यात असंख्य बड्या आसामी कार्यरत असून त्यांना राजकीय व शासकीय पाठबळ देखील आहे. सिन्नर तालुक्यात पूर्व भागातील पिंपरवाडी, मिरगाव, सायाळे येथील नदीपात्रात असणाऱ्या वाळूसाठ्यावर गेल्या अनेक वर्षांपासून वाळूमाफियांची नजर आहे. समृदीसाठी नदीपात्रे शासनाने ठेकेदारांसाठी खुली करून दिल्यावर वाळू व्यवसायात अग्रेसर असणाऱ्या अनेकांनी याचा फायदा उचलला असल्याचे बोलले जात आहे.
पाथरे ते सोनारी दरम्यान सिन्नर तालुक्यात दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कपंनीच्या माध्यमातून महामार्ग उभारणी करण्यात येत आहे. गौण खनिज वाहतूक व खोदकामासाठी या कंपनीकडे स्वमालकीची पुरेशी साधने असताना देखील अनेकांनी राजकीय वजन वापरून नदीपात्रातून गौणखनिज वाहतुकीसाठी उपठेकेदार म्हणून शिरकाव केला आहे.
पुढील किमान चार वर्षे काम करावे लागणार असल्याने प्रारंभी नाखूष असणाऱ्या दिलीप बिल्डकॉन मार्फत काही प्रमाणात गौण खनिज वाहतुकीसाठी खाजगी वाहनांना परवानगी दिली. मात्र मिळालेल्या या कामाचा संबंधीतांकडून सोयीस्कर गैरफायदा घेतला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. पिंपरवाडी येथील नदीपात्रातून गौण खनिजासोबतच वाळूचा देखील उपसा करण्यात येत असून हि वाळू भरलेली वाहने समृद्धीच्या साईटवर न जाता इतरत्र अनधिकृतपणे साठवली जात आहे. संबंधित वाळू माफियांची यंत्रणा या साठ्यातून वाळूची पद्धतशीर उचल करून ती पाण्याने धुऊन चढ्या भावाने विक्री करत आहे.
पिंपरवाडी सोबतच मिरगाव व सायाळे येथून देखील समृद्धीच्या नावाखाली वाळूमाफियांचा गोरखधंदा जोरात सुरु आहे. थेट नाशिकशी या व्यवसायाचे कनेक्शन जोडले असल्याची चर्चा आहे. गेल्या महिन्यात मिरगाव येथे वाळू चोरीला अटकाव होत असल्याने समृद्धी ठेकेदाराचे पोकलँड मशीन तोडून दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडला होता.
महामार्गाची खोदकाम सुरु असलेल्या या भागात स्थानिक ट्रॅक्टरचा देखील वाळूचोरीसाठी वापर जातो. असे ट्रॅक्टर अनेक वर्षांपासून वाळूचा चोरटा व्यवसाय करणाऱ्यांचे असल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वी वाळू भरलेली काही वाहने वावी येथील स्थानिकांनी पोलिसांच्या हवाली केली होती. मात्र सदर वाहने समृद्धीच्या कामावर नियुक्त असल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आल्यावर ती पुन्हा मार्गस्थ करण्यात आली.
विनारॉयल्टीचा धंदा 
समृद्धीसाठी गौणखनिज उपलब्ध करून घेताना महसूल विभागाकडे ठेकेदारास रॉयल्टी भरावी लागत नाही. खोदकाम करून महामार्गाच्या बांधकामास वापरात आणलेल्या गौणखनिजाची प्रत्यक्ष कामावर मोजणी केली जाते. व त्यानुसार शासन ठेकेदारास देयक अदा करते वेळी रॉयल्टीची निर्धारित रक्कम कापून घेते. या पद्धतीमुळे प्रत्यक्ष खोदकाम किती झाले याचे मोजमाप खाजगी वाहने वापरली तर ठेकेदारास समजत नाही.
या वाहनांनी जेवढे साहित्य साईटवर आणून टाकले तेच मोजमापात धरले जाते. त्यामुळे नदीपात्रातील वाळूची वाहतूक व्यावसायिक फायद्यासाठी करणे सहज शक्य होते. विनारॉयल्टीच्या या धंद्यात आपली वाहने समृद्धीच्या कामावर लागावीत यासाठी म्हणूनच ठेकेदारावर राजकीय संबंधातून दबाव टाकण्यात येत असल्याची चर्चा आहे.
वाळूचोरीच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी उपस्थित झाल्या होत्या. त्यानुसार चौकशी केली असता वाळू खोदकामाबाबत आढळून आले नाही. अवैध पद्धतींने वाळू साठा केला असल्यास कारवाई केली जाईल असे सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे यांनी सांगितले.
वाहनांवर जीपीएसने लक्ष ठेवणार 
समृद्धीच्या कामाआडून वाळूची वाहतूक होत असेल तर हा प्रकार दुर्लक्षित केला जाणार नाही. अपरिहार्यता म्हणून काही खाजगी वाहनांना गौणखनिज वाहतुकीसाठी वापरले जात आहे. या संधीचा कुणी दुरुपयोग करू नये असा इशारा दिलीप बिल्डकॉनच्या सूत्रांकडून देण्यात आला आहे. वाळूचोरीच्या घटना घडत असतील तर त्यात कंपनीचे नाव बदनाम होते.  यापुढे असे प्रकार होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जाईल. प्रत्येक खाजगी वाहनावर जीपीएस प्रणाली बसवून घेतली जाईल. याशिवाय खोदकाम होणाऱ्या ठिकाणी तसेच महामार्गाच्या साईटवर कंपनीकडून देखरेखीला स्वतंत्र माणूस ठेवला जाईल असेही सांगण्यात आले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!