Type to search

Breaking News Featured maharashtra ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : स्वरांपलीकडली ‘राग’रागिणी…

Share

काही व्यक्ती कधीच विस्मृतीच्या पडद्याआड जात नाहीत. काळ कितीही पुढे सरकला तरी या व्यक्ती कर्तृत्वरुपात कायमच चिरतरुण राहतात. काळाच्या ओघात त्यांच्या कर्तृत्वाचे आयाम आणि पैलू कितीही अपडेट झाले तरी या आयामाचा परिघ मात्र त्यांच्याच कर्तृत्वाने आखलेला असतो. त्यांच्या दैवी कलागुणांचा अविरत पाझर अलगदपणे आपली छाप कलेच्या प्रत्येक व्हर्जनवर सोडून जात असतो. सुरांच्या कलेतलं,  साधनेतलं असंच एक चिरंतन, अजरामर कर्तृत्व म्हणजे लतादीदी…

आई-बाबांची पिढी रेडिओवरची लता दीदींची सदाबहार गाणी ऐकून लहानाची मोठी झाली. हे भाग्य आमच्या पिढीला लाभलं नाही. पण अजूनही युट्युब वर लता-किशोर,  लता-मुकेशच्या गाण्यांना मिळणाऱ्या मिलियनपार views पाहिल्या म्हणजे साक्षात लताचे स्वर जणू  पुढच्या पिढ्यांसाठी चिरतरुण राहणार असल्याची साक्ष देतात. गेल्या काही दिवसांपासून लतादीदींच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या बातम्या कानावर पडून हुरहूर वाटत होती. त्यानिमित्ताने  लताचं स्वरांवरचं प्रेम माझ्या शब्दांवरच्या प्रेमातून व्यक्त करावं वाटलं.

लताला शोधायला लागले…अनेक लेखकांच्या लेखणीतून,अनेक पुस्तकांतल्या तिच्याविषयीच्या ओतप्रोत भावनांतून, अनेक दिग्गजांनी जागवलेल्या तिच्याविषयीच्या आठवणींतून,  तिच्या जीवनपटलावरच्या अनेक चित्रफितीतून… पण या सर्वांतून लता भेटली ती फारच अंधुकशी…

शेवटी कागदांचा पसारा बाजूला सारला. मनाची साद ऐकली आणि लता भेटली…  अगदी अलगदपणे भेटली… ती भेटली तिच्या गाण्यांतून. फक्त भेटली नाही,  तर भिडली लता. थेट काळजाला भिडली… कागद-पुस्तकांच्या पसाऱ्यातून लता केवळ एक व्यक्ती म्हणून भेटली. पण तिच्या गाण्यांतून एक ज्वाला म्हणून भिडली. एक वेदना बनून भिडली. हो ज्वालाच. अखंड, अविरतपणे धगधगत सात दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ज्वालाच.

लताचं गाणं हा दैवी चमत्कार म्हणतात काहीजण. काहींना लताचा कोकिळकंठ जादुई शक्ती वाटतो.  पण स्वरांचा हा अमूर्त आविष्कार,  तिच्या अखंड साधनेचा परिपाक वाटतो मला. तिनं आर्थिक विवंचनेतून गाणं गायला सुरुवात केली. प्रारंभकाळात तिनं गाणं गायलं आर्थिक गरज म्हणून.

पण तिचं गाणंच आज कित्येकांची मानसिक गरज आहे. तिला ऐकणारा प्रत्येकजण तिच्या प्रत्येक आलापातून,  तिच्या प्रत्येक स्वरातून स्वतः व्यक्त होत असल्याची अनुभूती घेतो. कारण लताचे स्वर म्हणजे केवळ कंठातून आलेला मधुर ध्वनी नाहीये. तर त्या स्वरांमध्ये भावना आहे, वेदनेचा हुंकार आहे, प्रेम आहे, विरह आहे, लटका राग आहे, ओढ आहे, आतुरता आहे, जाणिव आहे, कणव आहे… तो स्वर मानवी स्वभाववैशिष्ट्यांनी अगदी ओथंबून गेलेला आहे. साहजिकच तिचे सात स्वर ऐकणाऱ्या प्रत्येकच्या नवरसांना अगदी अलगदपणे काबीज करतात.

तसा लताला रेडिओवरून, सत्तर ते नव्वदच्या दशकांतील चित्रपटांतून साक्षात ऐकण्याचा अनुभव आमच्या पिढीच्या पदरात नाही. पण लहानपणापासूनच लताच्या सुखकर्ता-दुखहर्तानेच तर आमच्या गणरायाचं स्वागत आणि विसर्जन होत आलंय. ऐंशी-नव्वदच्या दशकातल्या ‘लग जा गले…’नी अनेकांच्या काळजाचा ठाव घेतल्याचं ऐकलं. पण आजही श्रेया घोषालच्या आवाजातलं हे गाणं ऐकल्यानंतर ‘लग जा गले…’

मधली लताची तरलता ऐकण्यासाठी आमची मनं स्थिरावतातच युट्युबवर. किंबहुना सुखावतात… सोळाव्या वर्षीच्या अवचित प्रेमीयुगुलांना बालिश आणि अवखळ संबोधलं असेल आमच्या मागच्या पिढीनं. पण, ‘सोला बरसकी..’मधल्या भावनांना प्रत्येकाने अगदी मनापासून सलाम केलाय. या अवचित वळणावरच्या काही लिखित क्षणांमधल्या व्याकरणविषयक चुकांनासुद्धा सलाम करते लता आपल्या गाण्यातून. ते थेट अंत:करणाला भिडतं. कारण लता ते स्वतः अंत:करणातून गाते. केवळ प्रेमभावनांची अभिव्यक्ती लतानं केली नाही. तर,  ‘मेरे वतन के लोगो’नंच  सैनिकांना, शूरांना लढण्याचं बळ दिल होतं, हे विसरून कसं चालेल.

आजही प्रत्येक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला लताच्या या गाण्याशिवाय देशभक्तीचा फिलच आल्याचं वाटत नाही. विसंगतीने भरलेल्या या स्पर्धेच्या युगात वावरताना काहीजण जगणंच विसरून बसलेत. अशावेळी ‘तुझसे नाराज नही जिंदगी…’ नंच तर हृदयाबरोबरच मनानं आणि मनभरून श्वास घ्यायला शिकवलं. लता आजकाल राणू मंडलच्या रूपातही भेटते कधी कधी. पण हा बेगडीपणा बाजूला सारून खरा स्वर, स्वरांसाठीचा खरा संघर्ष शोधायला अखेर लतापाशीच यावे  लागते.

विजय तेंडुलकर लतादीदीला म्हणत,  “तू रोज गातेस… तेच गात जातेस.. हे जग व्यवहारावर चालतं. तुझ्या गीतांनी कुणाचं पोट नाही भरत. तरीही लोक ऐकत चालले आहेत… वेड्यासारखे…” हो. लोक ऐकत चालले आहेत वेड्यासारखे.. कारण हा आनंदघन निर्व्याजपणे बरसत राहिला आहे. सात दशके हृदयाच्या अगदी कोपऱ्यातून हा आनंदघन रिता होत राहिला आहे. ऐकणाऱ्याच्या हृदयाला आनंदानुभूतीनं काठोकाठ भरत राहिला आहे.

लतादीदीच्या गाण्याला कृत्रिमपणा दुरूनही शिवला नाही. पण आज कृत्रिम प्राणवायूवर काही  काळ जगावं लागलं. अनेक रसिकांचं अस्वस्थ होणं साहजिक आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याच्या वार्तेनं दिलासा मिळणं तर त्याहून साहजिक आहे. तसं जन्माला आलेल्या प्रत्येकाला काळाच्या वारूवर स्वार होणं अटळ आहे. पण लतादीदी तू आहेस आमच्यात. तू नेहमीच असणार आहेस आमच्यासोबत… तू अमर आहेस…तू अजरामर आहेस… तुझ्या प्रत्येक गीतांतून…

‘तुझ्यासाठी नौशाद यांच्या चार ओळी –
‘करती हैं सभी दुनिया,  तारीफ लता तेरी;
हद यह हैं कि सुनता हैं आवाज खुदा तेरी|
तेरे गीतों को दिल का हमसफर यूं ही नंही कहते;
धडकता है दिल – ए – हिंदोस्तां आवाज में तेरी|’

– निकिता सुनील पाटील, लेखिका ब्लॉगर आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!