कोरोना : लोककलावंत व त्यांच्या सहकाऱ्यांना आर्थिक मदत करा – आनंद शिंदे

कोरोना : लोककलावंत व त्यांच्या सहकाऱ्यांना आर्थिक मदत करा – आनंद शिंदे

मुंबई | विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्राची लोककला व लोकपरंपरा जिवंत ठेवणाऱ्या कलावंत व त्यांचे सहकारी यांना उपजिवकेसाठी किमान आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक तथा सेक्रेटरी सुप्रसिद्ध गायक आनंद प्रल्हाद शिंदे (शिंदेशाही परिवार) यांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे केली आहे.

आज जगात देशात व राज्यात कोरोना व्हायरस या विषाणू जन्य आजारांने थैमान घातले आहे. जगातील प्रगतशील अशा अमेरीका, इटली, चीन अशा अनेक देश या आजाराशी लढत आहे. आपल्या देशात व राज्यात ही या आजाराने आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे हे एका संयमी व अभ्यासपूर्ण अशा पद्धतीने या संकटाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत.

तसेच, जनतेला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सद्य परिस्थिती बाबत माहिती देत, सरकारी आदेशाचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. मुख्यमंत्री यांनी दि. 20 मार्च रोजी 31 मार्च पर्यंत लॉकडाऊन ठेवण्याचा आदेश दिला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस देश लॉकडाऊन ठेवण्याचा आदेश दिला आहे.

केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे समजुन माझ्या सारखे असंख्य मराठी कलावंत घरात राहुन सरकारच्या आदेशाचे व सूचनांचे पालन करत सरकारच्या प्रत्येक आवाहानाला सहकार्य करीत आहे. महाराष्ट्राला लोककलेचा व परंपरेचा इतिहास आहे.

लावणी, भारूड, वग, लोकसंगित, तमाशा, जागरण गोंधळ व ढोल लेझीम, बॅन्जो पथक अशा कित्येक प्रकारतुन हे कलाकार आपली लोककला सादर करून आपला उदरनिर्वाह करित असतात. चैत्र महिनापासुन महाराष्ट्रातील अनेक गावाच्या जत्रा व यात्रांना सुरवात होत असते. शिवजयंती, आंबेडकर जयंती, लग्न समारंभ अशा विविध कार्यक्रमात या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत असते व यातुन मिळणाऱ्या मानधनावर यांचा कुटुबांचा उदरनिर्वाह चालतो. गर्दी आणि कार्यक्रम टाळण्याचा आदेश सरकारने दिल्याने यात्रा, जत्रेमध्ये मनोरंजनात्मक न  ठेवता यात्रा करण्यावर गावकारभाऱ्यांचा भर आहे.

त्यामुळे त्यांच्या कडून या कार्यक्रमाचे केलेले बुकिंगही रद्द केले जात आहे. आज महाराष्ट्रात 40 हजाराच्या जवळपास लोककलावंत आहे. कोरोना व्हायरस मुळे शासनाने लॉकडाऊन चा आदेश दिला त्यामुळे आपली कला सादर करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या हातावर पोट असणाऱ्या या कलाकारांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाने सांगितले आहे की, अन्न धान्य परिमंडळ विभाग यांच्या वतीने रेशनकार्ड धारकांना धान्य उपलब्ध करून देण्यात येईल पण माझा हा कलावंत बांधव हा महाराष्ट्रभर फिरून आपली कला सादर करत असल्याने त्याच्याकडे रेशनकार्ड संबंधित कोणतेही कागदपत्रे नाही आहे. मग तो शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या अन्न धान्याचा लाभ कसा घेऊ शकेल ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रभर फिरून आपली कला सादर करणाऱ्या या सर्व माझ्या सहकारी कलावंत बांधव व सहकारी कर्मचारी यांना किमान आर्थिक मदत शासनाच्या वतीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात आली असून राज्य सरकार ने या बाबत सकारात्मकता दाखवावी त्यास आम्ही कलाकाराची नाव पत्ते व खातेनंबर यांची माहिती राज्य शासनाला तात्काळ उपलब्ध करून देऊ असे असेही शिंदे म्हणाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com