Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगरात जोरदार पाऊस, सीना दुथडी

Share

परिसरातील गावांमध्ये बंधारे भरले; नदीकाठ मात्र कोरडाच

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने लावलेली हजेरी कायम असून, मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे सीना नदी दुथडी वाहिली. असे असले तरी शहराच्या आसपासचा भाग वगळता सीना नदी काठी असलेल्या गावांमध्ये मात्र पावसाने हुलकावणी दिली.

नगर शहरात मंगळवारी सायंकाळनंतर जोरदार पावसास सुरुवात झाली. मुसळधार असलेला हा पाऊस टप्प्याटप्प्याने रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. तसेच पहाटेही काही भागांत जोराचा पाऊस झाला. या पावसामुळे सीना नदी पहिल्यांदाच दुथडी वाहू लागली. मंगळवारी रात्री सावेडी, नागापूर, इसळक, निंबळक, एमआयडीसी, गजानन कॉलनी आदी भागात पाणी पाणी झाले. उत्तरा नक्षत्राच्या झालेल्या या जोरदार पावसामुळे नगर-कल्याण महामार्गावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली गेला. तेथील वाहतूक ठप्प झाल्याने ती केडगावमार्गे वळविण्यात आली. पाण्याचा जोर कमी झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. बुधवारी दुपारी पुन्हा शहरासह सावेडी, एमआयडीसी, नागापूर, इसळक- निंबळक, सावेडी, झोपडी कॅण्टीन आदी परिसरात जोरदार पाऊस झाला आहे.

साकतखुर्द, शिराढोण, दहिगाव, वाटेफळ, रुईछत्तीसी आदी गावांना पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे नदी दुथडी मात्र काठावरची गावे कोरडीच असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवडाभरापासून शहर परिसरात होणारा हा पाऊस ग्रामीण भागात मात्र अभावानेच एखादी सर कोसळत आहे. खरीप हातचा निसटला असून आता रब्बीही हातचा जातो की काय, अशी भीती शेतकर्‍यांना आहे.

या परिसरातील बहुतांश शेतकर्‍यांनी परतीच्या पावसाच्या आशेवर ज्वारी, हरभरा आदी पेरणी केली असून पिकांना आता चांगल्या पावसाची गरज आहे. नदीला आलेल्या पाण्याचा मोजक्याच शेतकर्‍यांना लाभ होणार असून, नदी पासून दूर अंतरावर असलेल्या शेतकर्‍यांना पावसाशिवाय पर्याय नाही.

हिंगणगावचा रस्ता पाण्याखाली
मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हिंगणगाव येथील सर्व बंधारे तुडुंब भरले. हिंगणगाव (ता. नगर) परिसरातील टाकळी खातगाव, जामगाव, भाळवणी परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे परिसरातील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरले. हिंगणगावमध्ये जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला. बंधार्‍यातील पाणी कमी होईपर्यंत गावात जाणारा वाहतुकीचा रस्ता बंद राहणार आहे. बंधार्‍याच्या बाजूने असणार्‍या शेतकर्‍यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. पिकासाठी पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. जलयुक्त शिवारमधून या गावात मोठे काम झाले. खोलीकरणही मोठया प्रमाणात झाल्यामुळे पाणी भरपूर साचले आहे. पहिल्याच पावसात बंधारे भरल्यामुळे ग्रामस्थांनी बंधार्‍याचे पूजन केले. यावेळी सरपंच आबासाहेब सोनावणे, अर्जुन पादीर, भाऊसाहेब सावळेराम सोनवणे, दौलत शंकर सोनवणे, एकनाथ झावरे, निसार पठाण, युन्नूस सय्यद, किरण खोडदे, अक्षय सोनवणे, अब्दुल कुरेशी, गोरक्ष सोनावणे, मंच्छिद्र मारे, दादाभाऊ सोनावणे, बाळासाहेब पानसरे, मुस्ताक सय्यद, ज्ञानदेव वाघमारे, गोरक्ष पानसरे, सुनील सोनावणे आदी उपस्थित होते.

वडगाव गुप्ताचा बंधारा भरला
वडगाव गुप्ता परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे नदीवरील सर्व बंधारे तुडुंब झाले आहेत. वडगाव गुप्ता येथील सीना नदीचे भारत फोर्ज, जनकल्याण समिती, पं. श्री श्री रविशंकर यांचे साधक, वडगाव गुप्ताचे सरपंच विजय शेवाळे आणि ग्रामस्थांनी लोकसहभागातून साडेतीन किलोमीटर खोलीकरण व रुंदीकरण केले आहे. या कामावर देखरेख करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान समिती स्थापन करण्यात आली होती. पावसाने नदीवरील बंधारे पूर्ण भरल्याने जवळपास 18 हजार कोटी लिटर पाणीसाठा झाला आहे. परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सीना नदीतील प्रदूषणामुळे पूर आल्यानंतर दुर्गंधीयुक्त फेस नदीतून वाहत होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!