सीनेतील अतिक्रमणाचा तेरावा

0

नगर टाइम्स,

मार्बल, गादी कारखाना, गोदाम पाडले

अहमदनगर (प्रतिनिधी) – नदीपात्रातील गाळ उपसा केल्यानंतर आता काठावरच्या पक्क्या बांधकामावर जेसीबीचा घाव टाकून ‘सीना’ अतिक्रमणमुक्तीच्या दिशेने प्रवाहीत होऊ पाहत आहे. आज गुरूवारी सकाळच्या सत्रात पाच ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा टाकून ती जमीनदोस्त करण्यात आली. गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेत कलेक्टरांनी अतिक्रमणांचा तेरावा घातला.

जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल व्दिवेदी यांनी सीना नदीपात्रातील अतिक्रमण हटविण्याची मोहिम आज बाराव्या दिवशी सुरू आहे. काटवन खंडोबा कमानीपासून आज मोहिमेस सुरूवात करण्यात आली. नदीला मिळणार्‍या नाल्यावर अतिक्रमण करून बांधलेले सायकल दुकान, पानटपरी, बांधकाम साहित्यविक्रीची पाच-सहा दुकाने जेसीबीने हटविण्यात आली.

या टपर्‍या हटविल्यानंतर महापालिकेचा जेसीबी सागर मार्बल दुकानाच्या पाठीमागील बाजूने शिरला. नदीपात्रात ठेवलेल्या फारश्या,कडप्पे हटविले. तेथे असलेेला पत्र्याचा शेड स्वत:हून काढण्यासाठी दुकानदाराने मुदत मागितली. त्यामुळे त्यांना मुदत देत मोहीम पुढे गादी कारखान्याकडे सरकली. तेथील लोखंडी शेड व पक्के बांधकाम जेसीबीने पाडले. त्याशेजारी असलेल्या इमामवाड्याची नदीपात्रात असणारी सिमेंट खोली व इतर बांधकाम पोकलेनच्या सहाय्याने पाडून टाकण्यात आले. एका बहाद्दाराने नदी पात्रात अतिक्रमण करून नव्याने बांधकाम करण्याची तयारी सुरू केली. अनधिकृत जागेवर इमारत बांधण्यासाठी पाया देखील खोदला. तसेच त्या भोवती सिमेंटची खोली बांधली होती. पात्रातील हे पक्के बांधकाम महापालिकेच्या अधिकार्‍यांनी हटिवले. ही कारवाई दुपारी उशीरापर्यंत सुरू होती.

नंदनवनला 25पर्यंत ढिल
नंदनवन लॉनचे मालक सुरेश जाधव यांनी या मोहिमे विरोधात कोर्टात धाव घेतली होती. या कारवाईला जाधव यांनी मिळविलेला स्टे कोर्टाने काल उठविला, मात्र सिनियर कोर्टात अपील करण्यासाठी जाधव यांना 25 जुनपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे तोपर्यंत त्यांना ढिल दिल्याची माहिती पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली.

झाडांचीही कत्तल
महापालिकेने सीना नदी पात्रातील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेत नदी काठी असलेल्या अनेक झाडाची कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रशासनाने पात्रातील सगळीच अतिक्रमण काढावी, मात्र झाडाची कत्तल करू नये अशी आम नगरकरांची अपेक्षा आहे. कारवाई दरम्यान गोळा झालेल्या नागरिकांमध्ये झाडांच्या कत्तलीमुळे नाराजीचा सुरू उमटत आहे. आज झालेल्या कारवाईत 5 ते 6 जुनी मोठी झाडे तोडण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*