श्रीरामपूर : शहर विकास महाआघाडीच्या गटनेतेपदी राजेंद्र पवार

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहर विकास महाआघाडीच्या गटनेतेपदी राजेंद्र जगन्नाथ पवार तर उपगटनेतेपदी वैशाली दिपक चव्हाण यांची निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या बदलाची नोंद करुन घेतली आहे.

श्रीरामपूर नगरपालिकेत महाआघाडीच्या गटनेत्या भारती कांबळे यांनी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना पालिकेच्या सभेत अनेकवेळा विरोध केल्याने त्यांची गटनेतेपदावरून गच्छंती करण्यासाठी आदिक गटाने यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव दाखल केला होता. मात्र हा ठराव करण्यासाठी बोलाविण्यात आलेली बैठक गटनेत्याच्या अनुपस्थितीत उपगटनेत्यांने आयोजित करणे आवश्यक असताना महाआघाडीच्या घटनेचे व नियमावलीचे पालन झालेले नसल्याचे कारण देत जिल्हाधिकार्‍यांनी गटनेता बदलाबाबतचा हा अर्ज निकाली काढला होता.

आदिक गटाने दि. 28 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, श्रीरामपूर या ठिकाणी पुन्हा बैठक घेतली. ज्येष्ठ नगरसेविका रजियाबी जहागिरदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस नगरसेवक राजेंद्र पवार, अक्सा पटेल, स्नेहल खोरे, दिपक चव्हाण, वैशाली चव्हाण, प्रणिती चव्हाण आदी उपस्थित होते. या बैठकीत गटनेता बदलाचा निर्णय घेण्यात आला.

श्रीरामपूर शहर विकास महाआघाडीचे हितासाठी व सर्व सदस्यांना कार्यकारिणीमध्ये काम करण्याची संधी मिळावी, या हेतूने आम्ही सर्वांनी एकविचाराने व बहुमताने श्रीरामपूर शहर विकास महाआघाडीच्या कार्यकारिणी मधील पदाधिकारी बदल करण्यात यावे, असा ठराव मांडला. त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर विकास महाआघाडीच्या गटनेतेपदी राजेंद्र जगन्नाथ पवार, उपगटनेतेपदी वैशाली दिपक चव्हाण, सचिवपदी अक्सा अल्तमश पटेल तर खजिनदापदी स्नेहल केतन खोरे यांची निवड करण्यात यावी, असे सर्वानुमते ठरले व त्याप्रमाणे त्यांची निवड करण्यात आली.

सदर ठरावावर सूचक म्हणून दीपक चव्हाण, अनुमोदक म्हणून स्नेहल केतन खोरे व गटनेता म्हणून राजेंद्र पवार यांची स्वाक्षरी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयास सादर झालेल्या अर्जानुसार महाआघाडीच्या कार्यकारिणीत बदलाची नोंद महाराष्ट्र सदस्य अनर्हता नियम 1987 च्या नमुना 4 मध्ये घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी म्हटले आहे. याबदलामुळे दि. 3 जानेवारी रोजी होणार्‍या विषय समितीच्या निवडणुकीतील राजकीय समिकरणावर परिणाम होणार आहे.

LEAVE A REPLY

*