Sunday, April 28, 2024
Homeनगरश्रीरामपूरचे उरूस मैदान बनलेय व्यसनींचा अड्डा

श्रीरामपूरचे उरूस मैदान बनलेय व्यसनींचा अड्डा

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे जनतेतून नाराजी; कारवाईची मागणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहराचे आराध्य दैवत मानले जाणारे हजरत सय्यदशाह कादरी बाबा यांच्या दर्ग्यासमोरील उरूस मैदान सध्या वेगवेगळे व्यसन करणार्‍या लोकांचा अड्डा बनला आहे. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisement -

दर्ग्यासमोरील कव्वालीचे मैदान हे 80 वर्षापासून उरूस मैदान म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या या ठिकाणी रेल्वेलाईनच्या कडेला असलेल्या भिंतीवर बसून तसेच मैदानातील लिंबाच्या झाडाखाली व अतिक्रमण केलेल्या टपर्‍याच्याच्यामागे संध्याकाळी अंधार पडल्यानंतर चरस, गांजा ओढणार्‍या लोकांचे थवेच्या थवे जमा होतात. याठिकाणी चिलीममधून निघणारा धूर आणि त्याचा उग्र वास यामुळे तेथून जाणार्‍या नागरिकांबरोबरच रेल्वे कॉलनीतील रहिवासी तसेच संध्याकाळी या भागातून जाणारे प्रवासी, महिला, विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शहराच्या सर्व भागातील गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक संध्याकाळ होताच याठिकाणी जमा होतात. याच मैदानावर गाड्यांची अतिक्रमणेही मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. समोरच्या बाजूने अनधिकृत टपर्‍या लावलेल्या असल्यामुळे त्यांच्या आडोशाला हे प्रकार बिनदिक्कतपणे चालतात. याबाबत पोलिसांकडे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या मात्र सोयीस्कररित्या पोलीस याकडे कानाडोळा करतात. येथे जमा होणार्‍या लोकांमध्ये अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सुद्धा आहेत. त्यामुळे येथे वारंवार भांडणे सुद्धा होत असतात.

तेथून जाणार्‍या लोकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. मैदानाचे पावित्र्य कायम राहण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करून या लोकांना येथून पिटाळले पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वारंवार होणार्‍या चोर्‍या, वाहतुकीचा बेशिस्तपणा, वाढती अतिक्रमणे यामुळे सर्वसामान्य लोक हैराण झाले आहेत. मात्र पोलिसांचे सध्या लक्ष नसल्याने शहरांमध्ये पोलिसांविषयी मोठी नाराजी पसरली आहे. गुन्हेगारांशी असलेले पोलिसांचे मित्रत्वाचे संबंध हा सुद्धा चर्चेचा विषय असून भुरट्या चोरट्यांना सध्या ऊत आला आहे. दर्ग्यासमोरील मैदानात चालणारे हे सर्व धंदे बंद करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या