Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

खड्ड्यांचे शहर म्हणून श्रीरामपूरची होतेय ओळख!

Share

खराब रस्त्यांमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ; नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; रस्ते दुरुस्तीची मागणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील सर्व रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून त्यामुळे डोळे आणि पाठीच्या आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने हॉस्पिटलमधील गर्दी वाढली आहे. शहरातील रस्ते हे आजपर्यंत कधी नव्हे इतके खराब झाले आहेत. ठिकठिकाणी पडलेले मोठ-मोठे खड्डे, त्यातून कसरत करीत वाहने चालवावी लागत असून दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकेकाळी चांगल्या रस्त्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीरामपूर शहर आज खड्ड्यांचे शहर म्हणून खराब रस्त्यामुळे कुप्रसिद्ध होत आहे.

शहरातील संगमनेर नेवासा रोडची तर अक्षरशः चाळण झाली असून नेहरू मार्केटपासून मार्केटयार्ड पर्यंतचा रस्ता अत्यंत जीवघेणा झाला आहे. रस्त्यावर खड्ड्यांची जाळी तयार झाली आहे. त्यातून गाड्या चालवताना अनेकांना पाठीच्या मणक्यांचे विकार जडले आहेत तर जे लोक डोळ्यावर चष्मा लावत नाही त्यांना डोळ्यांचे विकार झाले आहेत. त्यामुळे शहरातील डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या मोठमोठ्या रांगा दिसून येत आहेत.

भुयारी गटार योजनेच्या नावाखाली शहरातील जवळपास सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आले. त्यांची दुरुस्ती अद्यापही पूर्ण झालेली नाही. मेनरोडवर यापूर्वी कधीच खड्डे दिसत नव्हते. आता मात्र सर्वत्र खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. गोंधवणीरोड हा सुद्धा अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावर वाहन चालवणे एक दिव्य ठरत आहे. वाहनधारकांची वाढती संख्या व मोठमोठे खड्डे यामुळे वाहन चालक नगरपालिकेला लाखोली वाहत आहेत.

शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली असताना नगरपालिकेचे पदाधिकारी व नगरसेवक मात्र या महत्त्वाच्या प्रश्नाकडे डोळेझाक करीत आहेत. यापूर्वी चांगल्या रस्त्यांचे शहर असा श्रीरामपूरचा नावलौकिक होता. मात्र गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये कधी नव्हे एवढे रस्ते खराब झाल्याने श्रीरामपूरच्या नावलौकिकास बाधा येत आहे. तरी शहरातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची नगरपालिकेने तातडीने दुरुस्ती करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!