श्रीरामपूर : हक्काचा मतदारसंघ काँग्रेस सोडणार का?

0

अविनाश आदिकांच्या मागणीमुळे राजकीय ‘चलबिचल’

  • अशोक गाडेकर 

श्रीरामपूर –  काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी, अशी थेट मागणी राष्ट्रवादी काँगे्रेसचे प्रदेश सरचिटणिस अविनाश आदिक यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील इच्छुकांमध्ये ‘चलबिचल’ निर्माण झाली आहे. मात्र हा हक्काचा मतदारसंघ काँग्रेस सहजासहजी सोडणार नाही हेही तेवढेच खरे!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुथ संकल्प मेळाव्यात आदिक यांनी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासमोर गेल्या काही वर्षापासून आपण पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्वोतोपरी पर्यंत करत आहोत, मात्र हा मतदारसंघ काँगे्रस पक्षाकडे असल्याने व आपण मित्र पक्षाच्या भुमिकेत असल्याने मर्यादा येत आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यास पक्ष विस्ताराला वाव मिळेल असे सूचविले. एवढेच नव्हे तर जिल्हाध्यक्ष फाळके यांनी ही जागा मिळविण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडे प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात सन 1962 पासून 1985 व 1990 या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळविला आहे. 1962 च्या निवडणुकीत बाबुराव चर्तुभुज यांनी प्रथम काँग्रेसच्या विजयाचा झेंडा या मतदारसंघात रोवला. त्यानंतर जे. डब्लू. बनकर, गोविंदराव आदिक (सलग दोन पंचवार्षिक), भानुदास मुरकुटे यांनी काँग्रेसच्या विजयाची परंपरा सुरू ठेवली, मात्र 1985 च्या पंचवार्षिक निवडणुकीत दौलतराव पवार यांनी पुलोदच्या उमेदवारीवर विजय मिळवून काँगे्रसच्या या विजयात खंड पाडला.
त्यानंतरच्या (1990) निवडणुकीतही भानुदास मुरकुटे यांनी जनता दलाची उमेदवारी करून विजश्री खेचून नेली. त्यानंतरच्या निवडणुकीत मुरकुटे यांनी ही जागा पुन्हा काँग्रेसला मिळवून दिली. 1999 साली राष्ट्रवादी काँगे्रसचा जन्म झाला. या निवडणुकीत जयंत ससाणे यांनी काँग्रेसची उमेदवारी मिळाली. त्यांनी सलग दोन निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाची परंपरा जपली. सन 2009 साली हा मतदारसंघ अनुसुचीत जातीसाठी राखीव झाला. त्यानंतरही सलग दोन निवडणुकीत काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
या मतदारसंघात अद्याप काँगे्रस वगळता इतर पक्षाला आपला प्रभाव दाखविता आलेला नाही. या जागेची मागणी करणार्‍या राष्ट्रवादी काँगे्रसला अद्याप एकदाही हा मतदारसंघ काबीज करता आलेला नाही. राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी तालुक्यात महाआघाडीचा प्रयोग केला आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी झाला असला तरी त्यानंतरच्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेश सरचिटणिस अविनाश आदिक यांनी राष्ट्रवादीचे स्वतंत्र उमेदवार उभे करून महाआघाडीच्या प्रयोगाला छेद दिला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रसचा एकही उमेदवार विजयापर्यंत पोहचला नाही. कारण राष्ट्रवादीचा तालुक्यातील दुसरा गट (मुरकुटे) महाआघाडीसोबत होता.
मतदारदसंघातील राष्ट्रवादीचा मोठा गट माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे मुरकुटे यांची भूमिका महत्वाची आहे. सध्या तालुक्यातील राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये पडलेली उघड फूट पाहता ही जागा पक्षाला दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार विजयी करण्याची जबाबदारी घेण्याचा अविनाश आदिक यांचा निर्णय धाडसाचा ठरेल.

आमदार भाऊसाहेब कांबळेंचे काय होणार?
नगरपालिका निवडणुकीनंतर काँग्रेसचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी ससाणे गटातून बाहेर पडत पालिकेत आदिक गटाला ताकद दिली. एवढेच नव्हे तर त्यानंतरच्या निवडणुकीतही महाआघाडीसोबत ज़ावून तालुक्यातील राजकारणात आदिक व मुरकुटे गटाशी मैत्री केली. आता अविनाश आदिक यांनी थेट कांबळे यांच्या मतदारसंघाचीच मागणी केली आहे. त्यामुळे या मागणीमागे आदिकांचे राजकारण नेमके कोणते? आ.कांबळेच्या पथ्यावर पडणारे की पंचाईत करणारे, याविषयी देखिल वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

LEAVE A REPLY

*