श्रीरामपूर पोलीस ठाण्यात पासपोर्टसाठी अडवणूक

0

वयोवृध्दांना तासन तास ताटकळत बसावे लागते ; विभागाच्या कार्यपध्दतीवर नाराजी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पासपोर्टच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी गेलेल्या लोकांची अडवणूक केली जात आहे. वयोवृध्दांना तर तासन तास ताटकळत बसावे लागते. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या या विभागाच्या कार्यपध्दतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या पासपोर्टधारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ज्या व्यक्तीला पासपोर्ट काढावयाचा आहे त्या व्यक्तीविरुध्द गुन्हे दाखल आहेत का? केवळ एवढाच दाखला पोलीस ठाण्याकडून मिळणे गरजेचे असते; परंतु या पोलीस स्टेशनमधील कर्मचारी नको त्या चौकशी करुन नको त्या कागदपत्रांची मागणी करुन त्यांना हेलपाटे मारण्यास सांगितले जाते.
वास्तविक सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच पासपोर्ट कार्यालयातून तो अर्ज बाहेर पडतो. एक जरी कागदपत्र अपूर्ण असेल तर पासपोर्ट कार्यालयातून पोलीस ठाण्यात व्हेरीफीकेशनसाठी दिलेच जात नाही. तसेच प्रत्येक व्यक्तीकडून एका 100 रुपयाच्या स्टॅम्पवर अ‍ॅफेडेव्हीट करुन मी श्रीरामपूर शहरासह भारतात कोठेही गुन्हे दाखल नाही असे लिहून घेतले जाते.
असा प्रकार अन्य कोणत्याही पोलीस ठाण्यात लिहून घेतला जात नाही मग श्रीरामपूर पोलीस स्टेशनच त्याला अपवाद का असावे? जिल्ह्यातच काय महाराष्ट्रात कोठेही असा स्टॅम्प घेतला जात नाही. त्यानंतर पुन्हा स्टम्पवर शपथपत्र लिहून घेतले जातेणया सर्व कागदपत्रांंसाठी किमान 300 ते 500 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. एवढा त्रास सहन करुन सर्व कागदपत्रांची पूर्तता पूर्ण केल्यानंतरही चकरा तर माराव्या लागता व सर्व काम पूर्ण केल्यानंतर सरकारी चलनाच्या नावाखाली काही रक्कम घेत असतात.
सध्या पासपोर्ट विद्यार्थी नोकर वर्ग, व्यावसायिक, धार्मिक प्रवासासाठी खूप आवश्यक झालेला आहे. पासपोर्ट काढणे सोपे झाले परंतु पोलीस स्टेशनमधून एकही गुन्हा नाही असा शेरा देण्यासाठी खूपच अडचणीचे ठरले आहे.
तरी संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी यात लक्ष घालावी. त्यासाठी लागणारे अ‍ॅफेडेव्हीट कायदेशीर आहे का? ते शपथपत्र कोणत्या कायदेशीर नियमानुसार घेतले जाते? पोसपोर्टधारकाचे कागदपत्र पासपोर्ट कार्यालयाने तपासूनही पोलीस ठाण्यात पुन्हा ती सर्व पूर्तता करणे आवश्यक असते का? व्हाईट बॅक ग्राऊंडचे दोन पासपोर्ट फोटो कोणत्या नामनिर्देशनात नियमात मागितले जातात? वयाचे दाखल पहाण्याचा अधिकार पोलीस ठाण्यात आहे का पॅनकार्ड हे फक्त बँकेला आवश्यक असताना पोलीस ठाण्यात देणे गरजेचे असते का अशा एक ना अनेक गोष्टींसाठी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
जर पासपोर्टच्या कामासाठी पैसे देणे गरजेचे असल्यास त्यासाठी त्याची पावती देणे गरजेचे असते. चलन कोठे व कोणाच्या नावाने भरता याची माहिती द्यावी व नागरिकांना सुखकर पासपोर्ट कसा मिळेल यासाठी प्रयत्न झाल्यास नक्कीच पोलिसांसह नागरिकांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. या पोलीस ठाण्यातील पासपोर्ट विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक श्री. शिंदे याबाबत काय कार्यवाही करता याकडे विशेष लक्ष लागले आहे.
  •   एका वृध्द महिलेचे वय विचारुन त्यांचा जन्माचा दाखला मागण्यात आला. त्या वृध्द आजी म्हणाल्या माझा जन्म घरी झाला का दवाखान्यात हे मलाच माहित नाही. माझे आई-बाप वर गेले आता मी कोणाला विचारु. तिकडे काहीही करा आम्हाला माहित नाही अशा शब्दात तेथील एका कर्मचार्‍याने सांगितले. असे एक ना अनेक उदाहरणे या विभागात पहायला मिळत असल्याने अनेकांनी या विभागाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.  एका वृध्द महिलेचे वय विचारुन त्यांचा जन्माचा दाखला मागण्यात आला. त्या वृध्द आजी म्हणाल्या माझा जन्म घरी झाला का दवाखान्यात हे मलाच माहित नाही. माझे आई-बाप वर गेले आता मी कोणाला विचारु. तिकडे काहीही करा आम्हाला माहित नाही अशा शब्दात तेथील एका कर्मचार्‍याने सांगितले. असे एक ना अनेक उदाहरणे या विभागात पहायला मिळत असल्याने अनेकांनी या विभागाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. – साजिदखान पठाण

LEAVE A REPLY

*