Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीरामपुरात राज्य कुणाचं जनतेचा सवाल, चोर झाले शिरजोर अन् पोलीस कमजोर

श्रीरामपुरात राज्य कुणाचं जनतेचा सवाल, चोर झाले शिरजोर अन् पोलीस कमजोर

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरात सध्या भुरट्या चोर्‍या पेट्रोल चोरीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. पोलिसांचे या बाबीकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्यामुळे श्रीरामपुरात नेमकं राज्य कोणाचं? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहराच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चोर्‍यांच्या घटना वाढल्या आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी घराबाहेर लावलेल्या गाड्यांमधून पेट्रोल चोरी करण्याचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रारीही करण्यात आहेत. मात्र गुन्हे नोंदवून न घेता सोयीस्करपणे दुर्लक्ष करून पोलीस कारभार सुरू आहे.

त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून पोलीस कमजोर झाले आहेत की काय? असा प्रश्न सध्या शहरात चर्चिला जात आहे. गोंधवणी भागामध्ये जे पेट्रोल चोरीचे मोठे रॅकेट कार्यरत आहे ते सर्वश्रुत आहेच, परंतु शहरातील मिल्लतनगर, वार्ड नंबर 2 या भागात गेल्या काही दिवसांपासून गाड्यातील पेट्रोल चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर घरातून खिडकीतून मोबाईल चोरून नेण्याचे सुद्धा सत्र सुरू झाले आहे. गेल्या आठवड्यात ज्येष्ठ पत्रकार व शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण यांच्या वाड्यातून त्यांचा मोबाईल खिडकीतून चोरीला गेला. तसेच त्यांच्या बंधूंच्या वाहनातील पेट्रोल सुद्धा चोरून नेण्यात आले.

- Advertisement -

याबाबत पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी आदेश दिल्यानंतर पोलिसांनी 379 कलमान्वये मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला, मात्र त्याबाबत पुढे कोणताही तपास करण्यात आलेला नाही. गुलशन चौक, बजरंग चौक या परिसरामध्ये चोरट्यांचे वास्तव्य असल्याचे पोलिसांना सुद्धा ज्ञात आहे. मात्र या चोरांचा तपास करण्याची तसदी तपासी अंमलदार घेत नसल्यामुळे या भागातील जनतेत नाराजी व्यक्त होत आहे. शुक्रवारच्या आठवडे बाजारातून मोबाईल चोरी होण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. परंतु त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. काल-परवा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या राम मंदिर चौकातील तीन दुकाने फोडण्याचा धाडसी प्रयत्न चोरट्यांनी केला. यामध्ये फार मोठी चोरी झाली नसली तरी भर बाजारपेठेमध्ये चोर्‍या होत असताना पोलीस काय करतात? हा मोठा प्रश्न आहे.

शहरामध्ये वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्‍न निर्माण झालेला असताना वाहतूक शाखेची गाडी फक्त सायरन वाजवत फिरत असते. सिग्नल व्यवस्था असून अडचण नसून खोळंबा अशा प्रकारची आहे. शिवाजी चौकामध्ये पुलाखालून येणारी वाहने सिग्नल मुळे अडकून पडतात आणि येथे चढ असल्यामुळे एखाद्या गाडीचे ब्रेक फेल झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

पोलिसांची कामगिरी ही सध्या शहरांमध्ये चर्चेचा विषय आहे. दुचाकी चोर्‍यांचे प्रमाण सुद्धा वाढले असून पोलीस आणि चोर यांची मैत्री हा सुद्धा शहरांमध्ये चर्चेचा विषय आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख व अतिरिक्त पोलीस प्रमुख यांनी शहराच्या कायदा व सुव्यवस्था यामध्ये लक्ष घालून चोरट्यांना आश्रय देणार्‍या गृहखात्याच्या यंत्रणेतील घरभेद्यांची चौकशी करावी व शहरातील कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवावी अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या