ठेकेदारीवरून श्रीरामपूर पालिकेची सभा गाजली

0
डेली मार्केट ठेक्यावरून आरोप प्रत्यारोप 
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- गेल्या सहा ते सात महिन्यांपासून महाआघाडी सरकारच्या काळात दोन ते तीन वेळेस टेंडर काढूनही पुन्हा रिटेंडर काढले जाते तसेच जे ठेके दिले गेले ते जादा रकमेच्या दराने दिले गेले यावरून विरोधक व सत्ताधारी नगरसेवकांत एकमेकाविरूध्द आरोप प्रत्यारोपात सभा चांगलीच गाजली. विशेषकरून डेली मार्केट ठेका चांगलाच गाजला.
श्रीरामपूर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी सुमंत मोरे तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या सभेत डेली मार्केट ठेक्यावरून उपनगराध्यक्ष करण ससाणे, संजय फंड, मुजफ्फर शेख यांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. 4 हजार 100 दुकाने पालिकेने सांगितली तर त्याप्रमाणे दीड कोटी रुपये वर्षाला होतात, मग पालिकेने 1 कोटी कमीत कमी का टेंडरसाठी लावले नाही आणि पहिला ठेका जर रद्द केला तर त्यानंतर असलेल्या 47 लाखावाल्याला हा ठेका का दिला नाही? असा प्रश्‍न करण ससाणेंनी उपस्थित केला. त्यावर मुख्याधिकार्‍यांनी सांगितले की, यापूर्वीचे टेंडर 33 लाखांचे होते.
तीच मिनीमम व्हॅल्यू धरली जाते आणि जर पुन्हा टेंडर काढून ठेका दिला नसता तर तुम्हीच म्हणाला असता की, टेंडर का काढले नाही. दुसर्‍या ठेकेदाराने 45 लाख ही जास्तीची अमाऊंट भरल्याने त्याला ठेका देण्यात आला. पहिल्या ठेकेदाराकडून सर्व पैसे वसूल करा, अशी मागणी मुजफ्फर शेख, संजय फंड यांनी केली.
तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाईचीही मागणी त्यांनी केली. पहिला ठेका 30 तारखेला संपल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी दुसरा ठेकेदार पैसे कसे गोळा करू लागला? असा प्रश्‍न त्यांनी केला. तेव्हा सदर ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिलेली आहे, असे मुख्याधिकार्‍यांनी सांगितले. या विषयावर बोलताना नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले की, तुमच्याच मागच्या रेकॉर्डवरून हे टेंडर काढले होते. पालिकेच्या रेकॉर्डवरच मी मागच्या मिटींगमध्ये डेली मार्केटमधून पालिकेचे उत्पन्न वाढेल, असे बोलले होते.
तुम्ही रेकॉर्ड नेमके कसे ठेवले? असा सवाल करत मागच्या वर्षी दिलेल्या 33 लाखांच्या ठेक्यापेक्षा हा ठेका निश्‍चितच जादा आहे. त्यामुळे पालिकेचे इनकम वाढविण्याचाच माझा प्रयत्न आहे. मी काही माझ्या मनाने आकडे सांगितलेले नाहीत. तुम्हीच (मागच्या सत्ताधार्‍यांनी) ठेवलेल्या रेकॉर्डवरून मी बोलल्याचे नगराध्यक्षा आदिक यांनी फंड आणि मुजफ्फर शेख यांना सांगितले. या विषयावर अनेकांनी आरोप-प्रत्यारोप सुरू केल्यानंतर पालिकेच्या अधिकार्‍यांची अ‍ॅग्रीमेंट करून घेणे, वर्क ऑर्डर देणे, शिक्के मारणे ही कामे आहेत.
ही कामे अधिकार्‍यांनी निटनेटकी केलेली दिसत नाहीत, त्यामुळे अशा अधिकार्‍यांवर यात कारवाई केली पाहिजे, अशी मागणी अंजुम शेख यांनी केली. यावर बोलताना मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी सांगितले की, याबाबतची चौकशी केली जाईल. संबंधित ठेकेदारांना पैसे वसुलीसाठी नोटिसा दिलेल्या आहेत. त्याची पूर्तता न झाल्यास कारवाई करू, असे आश्‍वासन दिले.
यानंतर मेनरोडवर असणार्‍या फंड यांच्या साई सुपर मार्केटमध्ये असणार्‍या चार लाईट पालिकेने हेतूपुरस्सर बंद केल्याचा आरोप संजय फंड यांनी केला. या लाईट जैन मंदिराच्या होत्या, असे फंड यांचे म्हणणे होते. त्यावर नगराध्यक्षा आदिक यांनी या विषयाला तुम्ही धार्मिक रंग देऊ नका, विषय फिरवू नका, मंदिराच्या आड तुम्ही कमर्शिअल प्रॉपर्टी लपवता.
मंदिराचे लाईट तोडलेले नाहीत, ते लाईट तुमच्या कमर्शिअल प्रॉपर्टीचे होते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर ते लाईट मंदिराचेच असल्याचे फंड, नागरे, बिहाणी यांनी लावून धरले. हेतूपुरस्सर मुद्दाम हे लाईट काढल्याचा आरोप फंड यांनी यावेळी केला.
यावेळी दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप आणि शहरातील पार्किंग गायब झाल्याचे आरोप सुरू झाले. त्यामुळे वैयक्तिक विषयाला सुरुवात झाल्याने अंजुम शेख यांनी मध्येच सर्वांना सावध करत, प्रत्येकाच्या घराला काचा आहे, आपण एक दगड मारला तर दुसरा आपल्याकडे येतो, असे सांगत जैन मंदिरासमोर हायमॅक्स लावावेत, असे सांगितले.

दहा नगरसेवकांची अनुपस्थिती –
काल श्रीरामपूर पालिकेच्या सर्वसाधारण सभेला आठ ते नऊ नगरसेवक अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये पालिकेच्या गेटवर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे या नगरसेवकांच्या अनुपस्थितीचे कारण समजू शकले नाही.

दारूबंदीस भाजपासह राष्ट्रवादी नगरसेविकेचा विरोधच –
रस्ते वर्ग करण्याचा ठराव झालेला आहे का? असे नगरसेवक राजेश अलघ यांनी विचारले असता त्यावर मुख्याधिकारी मोरे यांनी सांगितले की, हो सदर ठराव 1989 साली झालेला आहे. याव्यतिरिक्त चर्चा सभागृहात झालेली नसताना दारू दुकाने सुरू करण्याबाबत एकमत असल्याची तथ्यहिन चर्चा शहरात सुरू झाली आहे. दारू दुकाने सुरू करण्यासाठी रस्ते वर्ग करण्याच्या ठरावाला भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक किरण लुनिया, रवि पाटील, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण यांच्यासह नगरसेविका स्नेहल खोरे यांचा विरोध होता व आजही आहे असे भाजपा शहराध्यक्ष किरण लुनिया यांनी सांगितले.

रिझर्व्हेशन जागेवर काही नगरसेवकांचा ताबा-फंड –
पालिकेने शहरात काही जागांवर रिझर्व्हेशन टाकलले असून त्यातील काही जागा नगरसेवकांनी ताब्यात घेतल्या आहेत तर काही जागांवर बांधकामेही सुरू केली आहेत. हे अयोग्य असून याबाबतची चौकशी करून त्यांची नावे नगराध्यक्षांनी जाहीर करावित, असे पालिकेत सुरू असलेल्या सभेत प्रश्‍न उपस्थित केला होता.

LEAVE A REPLY

*