Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीरामपूर पालिकेच्या सभेत एकमेकांवर चिखलफेक !

Share

विषयपत्रिकेवरील विषयांचा श्रीगणेशा होण्याआधीच सभा तहकूब; नगरसेवक मुख्तार शहा निलंबीत

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेली पालिकेची सर्वसाधारण सभा काल चार महिन्यांनंतर आयोजित करण्यात आली. मात्र विषयपत्रिकेवरील विषयांचा ‘श्रीगणेशा’ होण्याआधीच शहरातील अचानकनगर व नेहरुनगर येथील महिलांनी आपल्या समस्यांची कैफियत मांडण्यासाठी भर सभेत प्रवेश केला. या महिलांना सभेत बोलावण्याचा विरोधकांचा पूर्वनियोजित कट होता असा आरोप नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी करत नगरसेवक मुख्तार शहा यांना आपण निलंबीत करत असून त्यांनी सभा सोडून जावे असा आदेश सोडला. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांत चांगलीच जुंपली.अखेर विषयपत्रिकेवरील कोणत्याही विषयावर चर्चा न होताच सभा तहकूब करण्यात आली. अशा प्रकारची सभा तहकूब होण्याची पालिकेच्या सभेतील ही पहिलीच घटना आहे.

काल पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मुख्याधिकारी डॉ. बाबुराव बिक्कड, उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक अंजुम शेख, श्रानिवास बिहाणी, मुजफ्फर शेख, रवि पाटील, संजय फंड, प्रमोद लबडे, अ‍ॅड. संतोष कांबळे, सुभाष गांगड, शामलिंग शिंदे, राजेंद्र पवार, मुख्तार शहा यांच्यासह नगरसेविका भारती कांबळे, स्नेहल खोरे, तरन्नूम जहागिरदार उपस्थित होते.

प्रारंभी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे गृहराज्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी यावेळी प्रवरा नदीपात्रात बसविण्यात येत असलेल्या प्रोफॉईल वॉलला विरोध करून त्याबाबत ठराव करण्याची मागणी केली. त्यानंतर विरोधी गटाच्या नगरसेवकांनी नव्याने पालिकेत आलेल्या विभाग प्रमुखांची ओळख करून देण्याची मागणी केली. त्यानुसार अधिकार्‍यांनी ओळख परेड सुरू झाली. याच दरम्यान, अनुकंपा तत्वावर पालिकेत नव्याने भरण्यात आलेल्या पदांमध्ये पाथर्डीसह इतर ठिकाणचे कर्मचारी असल्याचे समोर आले.

त्यावेळी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मुजफ्फर शेख, संजय फंड व भारती कांबळे यांनी आपल्याकडे अनुकंपाखाली 16 लोक वेटिंगला असताना त्यांना का डावलण्यात आले? असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यानंतर मुख्याधिकारी डॉ. बाबुराव बिक्कड यांनी आपल्याकडे वर्ग 3 व 4 ची मिळून 33 पदे रिक्त असल्याचे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीच्या अनुषंगाने आपण माहिती पाठविल्याचे सांगितले.

दरम्यान, सत्ताधारी व विरोधकांचे प्रश्‍न सुरू असतानाच अचानक काही महिलांनी आपल्या समस्यांचे निवेदन घेऊन सभेत प्रवेश केला सभेत गोंधळास प्रारंभ झाला. शिपाई त्यांना बाहेर काढत असताना नगरसेवक मुख्तार शहा प्रवेशद्वारात गेले. त्यानंतर नगरसेवक मुख्तार शहा यांनी या महिलांना सभेत बोलाविल्याचे नगराध्यक्षा आदिक यांनी सांगत माझ्या अधिकारात मी मुख्तार शहा यांना निलंबीत करत असून त्यांनी सभेतून निघून जावे, असा आदेश केला. मात्र मुख्तार शहा यांनी संबंधित महिलांना मी बोलावले नसल्याचे सांगितले, असाच गोंधळ सुरू असताना नगराध्यक्षा आदिक यांनी सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले.

‘हा’ विरोधकांचा पूर्वनियोजित कट : आदिक

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- सभेत शहराच्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार होती मात्र सभेत महिलांना बोलावून सभेचा भंग केला आहे. विरोधकांचा हा पूर्वनियोजित कट होता. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली, असे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सभा तहकूब झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषेदत सांगितले. ज्या भागात या महिला राहतात ती जागा अतिक्रमीत आहे. रयत शिक्षण संस्थेची ती जमीन असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. बाबुराव बिक्कड, नगरसेवक प्रकाश ढोकणे, बाळासाहेब गांगड, जितेंद्र छाजेड, ताराचंद रणदिवे, रवि पाटील, नगरसेविका स्नेहल खोरे, वैशाली चव्हाण, तरन्नूम जहागिरदार, केतन खोरे उपस्थित होते.

चार महिन्यांनंतर सभा झाली. मात्र या गोंधळामुळे महत्त्वाच्या विषयांना खो घातला. 30 वर्षांपासून आम्ही पालिकेशी जोडलो आहोत. असा प्रकार कधीही झाला नाही प्रत्येक नगरसेवकाने असे केले तर चुकीचा पायंडा पडेल, असे मत नगरसेवक शामलिंग शिंदे यांनी व्यक्त केले.  राजेंद्र पवार म्हणाले, सभागृहात विषय मांडण्याची पध्दत असते. मात्र नगरसेवक मुख्तार शहा यांनी केलेला हा प्रकार निंदनीय आहे. सुरू असलेली कामे थांबविणे हे विरोधकांचे काम आहे. कालच्या सभेत महत्त्वपूर्ण विषय असलेल्या अपंगासाठीच्या निधीबाबत चर्चा होणार होती. मात्र या गोंधळामुळे अनेक महत्त्वाचे विषय राहून गेले. यापूर्वी असे कधी झाले नाही मात्र एखाद्याचे निलंबन करण्याची वेळ येते याबद्दल वाईट वाटत असल्याचे आदिक म्हणाल्या.

‘कर्नाटकी’ विषय टाळण्यासाठी सभा तहकूब : ससाणे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- व्यावसायिक कर्नाटकी यांच्या आत्महत्याकांडाचा विषय चर्चेला येणार असल्यानेच ही सभा तहकूब करण्यात आल्याचा आरोप उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केला. पालिकेची सभा तहकूब झाल्यानंतर विरोधी नगरसेवकांच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड, ज्येष्ठ नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, मुख्तार शहा, दिलीप नागरे, नगरसेविका भारती कांबळे, मनोज लबडे, भारती परदेशी, आशा रासकर, मीरा रोटे उपस्थित होते.
कॅनाल लगतच्या घासगल्लीत जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीने त्यावेळी 22 टपर्‍या दिल्या होत्या त्या आता कुठे गेल्या? असा सवाल नगरसेविका भारती कांबळे यांनी उपस्थित केला. तर 1 ते 22 ज्यांची नावे आहेत त्याप्रमाणे गाळ्यांचे वाटप करावे असे सांगून सध्या पालिकेची स्थिती ‘आंधळं दळतयं अन् कुत्रं पिठ खातं’ अशी झाल्याची टिप्पणी त्यांनी केली.

तर गाळ्यांचे काम सुरू असताना प्लॅन मंजूर आहे की नाही हे पहावे लागते. परवानगी नाही, गाळ्यांचे काम पूर्ण व्हायला आले तरी लक्ष दिले नाही. यास मुख्याधिकारी व प्रशासन जबाबदार असल्याने कर्नाटकी यांच्या मृत्यू प्रकरणी मुख्याधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी केली. गाळे वाटप केल्यानंतर नंबर टाकले. सर्व टपरीवाल्यांना गाळे दिले. 24 ऐवजी 48 गाळे करण्याचे कारण काय? असा प्रश्‍न संजय फंड यांनी उपस्थित केला. तर पाच महिन्यांनी पालिकेची सभा होते. सभेतील विषयांमुळे आचारसंहितेवर परिणाम होणार नाही असे असतानाही सभा उशिरा का घेतली असा सवाल उपस्थित केला.

 

 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!