श्रीरामपूर पालिकेतील वाद : तोंडावर बोट, कानावर हात!

0

पाहिले अनेकांनी, बोलण्यास मात्र नकार
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – अतिक्रमणाच्या वादग्रस्त विषयावरून आता वादाच्या ठिणग्या झडू लागल्या आहेत. श्रीरामपूर नगरपालिकेत गुरूवारी प्रमुख पदाधिकार्‍यांसमोर उडालेली खडाजंगी चर्चेत आली आहे. मात्र असा काही प्रकार घडलाच नाही, असा पावित्रा अनेकांनी घेतल्याने ‘बंद दाराआड घडले काय?’ याची उत्सुकता वाढली आहे.

श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणाचा विषय गेल्या काही दिवसांपासून पेटला आहे. यावरून रोज नवा राजकीय अंक रंगत आहे. परस्पर तक्ररी करणे, कारवाईचा बडगा उचलणे आणि त्यानंतर ‘व्यवहार’ सुरळीत होणे, असे प्रकार घडत असल्याची दबकी चर्चा शहरात आधीपासून आहे. गुरुवारी मात्र थेट पालिकेच्या इमारतीतच यावरून भडका उडाल्याची खबर आहे.

‘व्यवहार’ बिघडल्याने दोघेजण पदाधिकार्‍याच्या दालनातच एकमेकांवर तोंडसूख घेत होते. यात एकाची तब्येत बिघडली. म्हणून त्याला पाणी पाजून शांत करण्याची वेळ इतरांवर आली, अशी चर्चा आहे. या वादाचे काही प्रत्यक्ष साक्षीदार आहेत तर काहींनी घडलेला प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट केल्याचे म्हटले जाते.

पण आश्‍चर्यकारकरित्या या प्रकरणाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांनी गुळणी धरली आहे. कोणीही बोलण्यास तयार नाही. काहीच घडले नाही, असा पालिकेतील लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांचा अविर्भाव होता. याप्रकरणाबाबत कोणीही स्पष्ट बोलण्यास तयार नसल्याने वादाचे गुढ अधिकच वाढले आहे.

कोण कोणावर धावून गेले? का धावून गेले? नेते मध्ये का पडले नाहीत? असे अनेक प्रश्‍न पालिका वर्तुळात चर्चेत होते. त्यावर मात्र कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही. या प्रकरणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अनेकांनी तोंडावर बोट आणि कानावर हात ठेवले. याबाबत काही विचारू नका, अशी काहींची प्रतिक्रीया होती. तर काहींनी प्रतिक्रीया देणे टाळले.

LEAVE A REPLY

*