Wednesday, April 24, 2024
Homeनगरमौलाना आझाद चौकातील पाण्याच्या टाकीची सुरक्षा वार्‍यावर!

मौलाना आझाद चौकातील पाण्याच्या टाकीची सुरक्षा वार्‍यावर!

स्वच्छतेचेही वाजले बारा, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील मौलाना आझाद चौकातील पाणीपुरवठा करणार्‍या पाण्याच्या टाकीची सुरक्षा व्यवस्था वार्‍यावर सोडण्यात आली आहे. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून टाकीची स्वच्छता नसल्याने स्वच्छतेबाबतही बारा वाजले आहेत. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु पालिका प्रशासनाचे टाकीच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष आहे.

- Advertisement -

अनेक दिवसांपासून शहरातील नागरिकांना अस्वच्छ पाणीपुरवठा होत आहे. त्यातच नगरपालिकेमार्फत आपल्या घरी येणारे पाणी ज्या टाक्यांतून येते त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. येथील मौलाना आझाद चौकातील पाण्याच्या टाकीवर जाणार्‍या पायर्‍या तुटल्याने त्या टाकीला धोका निर्माण झाला आहे. वर जाता येत नसल्याने टाकीची स्वच्छताही करता येत नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून टाकीची स्वच्छता करण्यात आलेली नाही. या टाकीद्वारे शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

परंतू टाकीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. टाकीची साफसफाई झालेली नसल्याने शहरातील नागरिकांना अस्वच्छ पाणी प्यावे लागत आहे.
सदर टाकी स्वच्छ झाली नसल्याने टाकीत शेवाळ व अन्य घाण मोठ्या प्रमाणावर साचली आहे. यामुळे यातील पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होऊ शकतात. या गंभीर विषयाकडे नगरपालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. जबाबदार अधिकारी व नगरसेवकांचे या गंभीर बाबीबाबत अनेक वेळा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी याची योग्य दखल घेतली नाही. तरी लवकरात लवकर पाण्याच्या टाकीची स्वच्छता व्हावी अशी, मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

…अन्यथा गेटबंद आंदोलन

मौलाना आझाद चौकातील पाण्याची टाकीची साफसफाई करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा न झाल्यास एक जानेवारी 2020 रोजी नगरपालिका गेटबंद आंदोलन करण्यात येईल.
-अहमदभाई जहागीरदार, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना.

- Advertisment -

ताज्या बातम्या