नगर पाठोपाठ श्रीरामपुरातही गणेश मंडळे-प्रशासनात संघर्ष

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – आम्ही नेहमी बसवितो त्याच ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना करू अन्यथा गणेशोत्सव साजरा करणार नाही अशी भूमिका गणेेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली. तर रस्त्यावर बाप्पांची मूर्ती बसविता येणार नाही यावर प्रशासन ठाम असल्याने नगर पाठोपाठ श्रीरामपूर शहरातील गणेशोत्सवावरून प्रशासन आणि गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांत संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

गणेशोत्सव शांततेत व्हावा यासाठी काल शांतता समितीची बैठक पार पडली. त्यावेळी शहरातील मानाचा गणपती आझाद मैदान, श्रीराम तरुण मंडळ यांच्यासह चार मंडळांनी आतापर्यंतच्या परंपरेनुसार मेनरोडवर गणपती मंडळाची स्थापना करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी सूचना मांडली. त्यावर पोलीस प्रशासनाने कायदेशीर बाबी पाहून प्रशासन सहकार्याची भूमिका घेईल, असे आश्‍वासन दिले. त्या पार्श्‍वभूमीवर रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास प्रातांधिकारी तेजस चव्हाण, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार सुभाष दळवी, पो. नि. श्रीहरी बहिरट यांनी श्रीराम चौकात येऊन जागेची पाहणी केली व तेथे मंडळांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली.

यावेळी आम्ही 14 वर्षांपासून येथे गणेशाची प्रतिष्ठापना करीत असल्याचे कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी सांगून वाहतुकीला अडचण येणार नाही अशा पध्दतीने गणेशाची प्रतिष्ठापना केली जाईल अशी ग्वाही दिली. तर पोलिसांनी रस्त्याच्या एका बाजूला एखाद्या दुकानदाराची परवानगी घेऊन त्याच्या दुकानासमोर गणेशोत्सव करावा असे सुंचविले. पण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हे मान्य झाले नाही. आहे त्याच जागेवर गणेशाची प्रतिष्ठापना करून अन्यथा गणेशाची प्रतिष्ठापना केली जाणार अशी भूमिका गणेश मंडळांनी घेतली. यावेळी मानाचा गणपती आझाद मैदान मित्रमंडळाचे मनोज नवले, अशोक उपाध्ये तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*