श्रीरामपूर तालुक्यातून मलेरियाचे डॉक्टरच गायब

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यात सध्या आरोग्याच्या अनेक तक्रारी असून आरोग्य सुविधा पुरविली जात नाही. मलेरियाच्या डॉक्टरांनी तर नेहमीच गावात जाऊन तपासणी करण्याची गरज असताना मलेरियाचे डॉक्टरच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
त्यांच्याविरुध्द काय कारवाई करणार असा सवाल केला असता त्यांच्याविरुध्दचा अहवाल वरिष्ठांना पाठवणार असल्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले. तालुक्यात जवळपास 25 बालके लसीकरणापासून वंचित असल्याचे अहवालात उघड झाले आहे. त्यांना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण केले जाणार आहे.
पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मासिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी उपसभापती बाळासाहेब तोरणे होते. यावेळी गटविकास अधिकारी मोहन जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी काळोखे, पंचायत समिती सदस्य अरुण पा. नाईक, सौ. वंदना मुरकुटे, सौ. संगीता शिंदे, विजय शिंदे, सौ. कल्याणी कानडे, सौ. वैशाली मोरे आदी उपस्थित होते.
आपापल्या विभागाच्या अडचणी मांडत असताना विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देताना अधिकार्‍यांकडे साधी टिपण्णी नसल्यामुळे त्यांना उत्तरे देण्यास उशिर लागत होता त्यावेळी गटविकास अधिकारी त्यांची बाजू सावरून घेताना दिसून आल्याने पंचायत समिती सदस्यांनी त्यांना सभेला येताना तयारी करून येत चला; प्रत्येक प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे आपल्याकडून मिळायला हवी, असे अधिकार्‍यांना सुनावले.
सध्या अंगणवाडी सेविकांचा संप चालू असल्यामुळे शालेय पोषण आहार वाटपात मोठी अडचण निर्माण होत आहे. याबाबत पर्यायी व्यवस्था त्वरित करण्यात यावी अशी सूचना मांडण्यात आली. यावेळी राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्पाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली.
तालुक्यातील वैद्यकीय विभागाबाबत सदस्य वंदना मुरकुटे यांनी नाराजी व्यक्त केली. टाकळीभान येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी अस्वच्छता आहे तसेच पढेगावच्या आरोग्य केंद्राबाबत नाराजी आहे. आम्हाला न बोलाविता बैठका घेतल्या जातात असा आरोप त्यांनी केला.
रस्त्यांची कामे होत नाहीत, मागील सभेत मंजूर झालेले विषय असताना पुढील सभेत तो विषय चर्चेला का यावा? अशी विचारणा अरुण पा. नाईक यांनी केली. त्यावेळी सभेत ठराव होऊन महिने दोन महिने उलटल्यानंतरही कामे होत नाही.
याबाबत ठेकेदारांवर कारवाई करा अन्यथा अधिकारी त्यास जबाबदार आहेत का हे पहा असे सौ. मुरकुटे यांनी सांगितले. सभेत काही विषयांची चर्चा झालेलीही नसते तसेच ठरावही केले जात नाहीत तरी ती कामे न विचारता केली जातात, असा आरोप त्यांनी केला. यापुढे ठराव झालेला असेल तरच खर्च करावा आणि त्या खर्चास मंजुरी घ्यावी असे सांगितले.
लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांना केंद्र शासनाने 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्याची योजना आहे. अंगणवाडी सेविकांनी घरोघर जाऊन याबाबतची माहिती घेतली. तालुक्यात 25 बालके लसीकरणापासून वंचित असल्याचे लक्षात आले आहे.
त्यामुळे त्यांना दि. 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरच्या दरम्यान विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन प्रत्य़क्ष लसीकरण करणार आहेत. आपल्या तालुक्यात सहा 6 प्राथमिक केंद्र व 30 उपकेंद्र यात ही योजना राबविली जाणार आहेत. यात 140 आशा वर्कर व 125 आरोग्य कर्मचारी या मोहीमेत भाग घेणार आहेत.

 बायोमेट्रीकनुसारच पगार करावेत  –  जिल्हा परिषदेशी निगडीत सर्व विभागांना बायोमेट्रीक दिलेले असताना त्यांचा वापर केला जात नाही. बिघडले असल्याच्या नावाखाली ते बाजूला ठेवले जात असल्यामुळे मनमानेल पध्दतीने कामावर जाणे, कार्यालयात न थांबणे असे प्रकार सर्रास होऊ लागल्याने त्याचा परिणाम कामावर होऊ लागला आहे. त्यामुळे कालच्या सभेत प्रत्येक विभागाच्या कार्यालयांमध्ये आधार लिंक बायोमेट्रीक बसवूनच त्यांचे पगार काढले जावेत अन्यथा पगार काढू नये असा ठराव करण्यात आला आहे. श्रीरामपूर पंचायत समिती कार्यालयातही बायोमेट्रीक एकदोन दिवसांत चालू करणार असल्याचे गटविकास अधिकारी श्री. जाधव यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*