श्रीरामपूरकरांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ!

jalgaon-digital
3 Min Read

आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांत संताप

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहराला गेल्या दीड महिन्यापासून बोरींगची चव असणारा पाणीपुरवठा होत असताना आता ज्या कालव्यामार्फत शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये पाणी सोडले जाते त्या कालव्यामध्ये घाणीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झाले आहे. नगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ खेळला जात आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

कालव्यात साचलेली घाण व त्यातून निर्माण झालेले जीवाणू आणि विषाणू आणि त्यांना सोबत घेऊन होणारा पाण्याचा प्रवास यामुळे शहरातील जनतेचे आरोग्य बिघडले आहे. या दूषित पाण्यामुळे शहरांमध्ये विविध प्रकारचे रोग वाढले आहेत. नगरपालिकेने याबाबत गंभीरपणे दखल घेऊन कालव्यात जमा होणार्‍या या कचरा आणि घाणीचा बंदोबस्त करून याला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना तातडीने करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रवरा कालव्याच्या नॉर्दन ब्रँच येथून डावीकडे जाणार्‍या कालव्यामार्फत शहरातील साठवण तलावामध्ये पाणी घेतले जाते.

दहाव्याच्या ओट्यापासून गोंधवणी रोडवरील पुलापर्यंतच्या कालव्यामध्ये कालव्याच्या दोन्ही बाजूकडील राहणारे नागरिक घरातील कचरा व इतर प्रकारची सर्व घाण थेट कालव्यातच टाकतात. सध्या कालव्याला पाणी नसले तरी पूर्वीच्या जमा असलेल्या पाण्यामध्ये शेवाळ साचले आहे. कचर्‍यामुळे तेथे जंतू व जिवाणू निर्माण झाले आहेत. मृत जनावरे, कुत्रे, कपडे, प्लॅस्टिक व इतर सर्व प्रकारचा कचरा कालव्याशेजारचे राहणारे लोक थेट कालव्यात टाकतात. तो कचरा साचून त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाटाला पाणी येण्यापूर्वी या कालव्याची साफसफाई जरी केली जात असली तरी पाणी गेल्यानंतर जो कचरा जमा होतो तो साचल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी निर्माण होऊन ती पाण्यामध्ये मिसळली जाते. यामुळे पाणी दूषित होते. सध्या शहराला केला जाणारा पाणीपुरवठा हा सुद्धा चर्चेचा विषय झालेला आहे. साठवण तलावामध्ये होणारा पाणीपुरवठा जास्तीत जास्त शुद्ध व्हावा यासाठी नॉर्दन ब्रँचपासून गोंधवणीच्या पुलापर्यंत कालव्याच्याकडेने भिंत उभारावी किंवा नॉर्दन ब्रँचपासून साठवण तलावापर्यंत वेगळी मोठी पाईपलाईन टाकून बंद नलिकेद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळला जाणारा हा जीवघेणा खेळ थांबवावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

पिण्याच्या पाण्याची चव पूर्ववत होण्यासाठी कार्यवाही व्हावी !
दरम्यान, गेल्या दीड महिन्यापासून नळाला येणार्‍या पाण्याची चव बदलली आहे. प्रत्येक भागातून याबाबत तक्रारी नगरपालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभेत याबाबत खुलासा करताना पाणी दूषित नसल्याचे जाहीर केलेले असले तरी पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणार्‍या क्लोरिन पावडरमुळे ही चव बदलल्याची चर्चा शहरात आहे. त्यासाठी सध्या वापरात असलेली क्लोरिन पावडर बदलण्याची व पाण्याची चव पूर्ववत होण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने कार्यवाही करण्याची मागणी जनतेने केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *