राजकीय दहीहंडीत श्रीरामपूरकर दंग

0
श्रीरामपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसची दहीहंडी सोहळ्यात बोलताना अभिनेत्री पुजा सावंत. समवेत नगराध्यक्षा अनुराधा आदिक, सरचिटणीस, अविनाश आदिक आदी.

अभिनेत्रींच्या उपस्थितीमुळे रंगत वाढली; बक्षिसांनी केला लाखाचा आकडा पार औरंगाबादचे भवानीनगर मित्रमंडळ व शिर्डीचा बजाव ग्रुप ठरले बक्षिसाचे मानकरी

श्रीरामपूर (प्रतिनीधी)- शहरात सध्या विकासापेक्षा राजकीय चढाओढीला महत्व आले आहे. या कुरघोडीच्या राजकारणातून यावर्षी दहीहंडीही सुटली नाही. काँग्रेसचा ससाणे गट व भाजप विरूध्द राष्ट्रवादीचा आदिक गट या सत्ता स्पर्धेत उतरल्याने दहीहंडी फोडणार्‍या संघांना लाखाच्या पुढील रकमेचा लाभ झाला आहे. त्यात दोन्ही गटांनी गर्दी खेचण्यासाठी अभिनेत्रींना निमंत्रित केल्याने या दहीहंडीच्या डावात आणखी रंग भरला. श्रीरामपूर दहीहंडी उत्सवाची दहीहंडी औरंगाबाद (संभाजीनगर) येथील भवानीनगर मित्रमंडळ पथकाने तर राष्ट्रवादीची दहीहंडी शिर्डीच्या बजाव ग्रुपने फोडली.

श्रीरामपूर दहीहंडी उत्सव समितीच्यावतीने गेल्या सहा वर्षापासून येथील श्रीराम मंदीर चौकात या उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी या माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांच्या स्मरणार्थ सिध्दार्थ गिरमे यांच्या वतीने ही दहीहंडी फोडणार्‍या गोविंदांच्या संघास 1 लाख 11 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. एवढेच नव्हे तर या कार्यक्रमासाठी ‘खुलता कळी खुलेना’, ‘चूक भूल द्यावी-व्यावी’ या मराठी मालिकेतील अभिनेत्री ऋतुजा लिमये हिला निमंत्रीत केले.

ससाणे गटाने आयोजित केलेल्या या दहीहंडी तोडीस तोड उत्तर देण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आदिक गटाने याचदिवशी व वेळेत थत्ते मैदान येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून बक्षिसाची रक्कम 1 लाख 25 हजार रुपये ठेवली. सम्राट गु्रप सेवा मंडळ व राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आयोजित या दहीहंडीसाठी बक्षिसाची रक्कम वाढविण्याबरोबरच ‘दगडी चाळ’ व ‘पोस्टर बॉईज’ चित्रपट फेम अभिनेत्री पूजा सावंत हिला निमंत्रीत करून गर्दी खेचण्याचा डाव टाकला.

अभिनेत्रींना पाहण्यासाठी श्रीरामपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदांबरोबरोबरच उपस्थित तरूणांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला. व्यासपीठावर अभिनेत्रींचे आगमन होताचा एकच जल्लोष झाला. राममंदिर चौकात रात्री 8.45 वाजता अभिनेत्री ऋतूजा लिमये हिचे आगमन झाले. तिने उपस्थितांना हात उंचावूून अभिवादन करताना प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी फोडण्यासाठी औरंगाबाद (संभाजीनगर) येथील भवानी नगर मित्रमंडळ पथकाने एकावर एक 6 थर रचूून ही दहीहंडी फोडली. दरम्यानच्या काळात युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले, ‘श्रीरामपूर येथे दहीहंडीचे स्वरुप एवढे मोठ्या प्रमाणावर असते, याची कल्पना नव्हती आता, पुढील वर्षी स्व. जयंतराव ससाणे यांच्या स्मरणार्थ यापेक्षाही मोठ्या स्वरुपाचा दहीहंडीचा मी व करण ससाणे एकत्र येवून करु.’

राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्यावतीने थत्ते मैदनावर आयोजित सोहळ्यात अभिनेत्री पूजा सांवत हिने श्रीरामपूरकारांना तुमच्या प्रेमामुळे मी भारावून गेले असून पुढच्या वर्षी कोणताही उत्सव असला तरी मला हाक द्या, मी नक्की येईल, असा शब्द दिला.  नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांना उदेदशून पूजा सांवत म्हणाली ‘ मी हे खात्रीने सागू उच्छिते पुढच्या काळात काही नेतृत्व श्रीरामपुरातून उभे राहतील आणि त्यांचे आदर्श तुम्ही असाल.’ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, सागर कुर्‍हाडे, नगरसेवक राजेंद्र पवार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिर्डी येथील बजाव गोविंदा गु्रपने 5 थर रचून ही दहीहंडी फोडून 1 लाख 25 हजार रुपयांचे बक्षिस पटकाविले.

डॉ. विखे व ससाणे यांचा ठेका
काल दहीहंडी कार्यक्रमाप्रसंगी डॉ. सुजय विखे पाटील व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी ‘ केलं पब्लिकचं गं वाटोळे बया!’ या गाण्यावर ठेका धरला. या ठेक्याला उपस्थित प्रेक्षकांनी डान्स करून दाद दिली.

LEAVE A REPLY

*