Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीरामपुरातील हुसेननगरमध्ये गोळीबार

Share

आरोपींसह पाच जखमी || दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपुर (प्रतिनिधी) – शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात असलेल्या परस्पर विरोधी तक्रारीवरून काल सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास शहरातील वॉर्ड-1 मधील हुसेननगर भागात गोळीबार करण्यात आला. यात तिघे जखमी झाले, तर गोळीबार केल्यानंतर पळताना रस्त्यावर पडल्याने दोघे जखमी झाले. जखमींवर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

मंगळवार दि. 12 रोजी दुपारी घरासमोर मुलांचा गोंगाट सुरू असताना त्यांना रिजवाना फरीद शेख यांनी हटकले. या कारणातून शेजारी राहणार्‍या रिजवाना शेख व मेहरून्निसा शेख यांच्या कुटुंबांत वाद झाले. हा वाद शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. याठिकाणी दोन्ही कुटुंबांच्या वतीने परस्पर तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर बुधवार 13 रोजी दोन्ही कुटुंबांना समज देण्यासाठी पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. दोन्ही कुटुंबीयांशी पोलिसांची चर्चा झाल्यानंतर ते घरी आले होते.

दरम्यान, मेहरून्निसा हिने औरंगाबाद येथील नातेवाईक सय्यद मुजीब व शेख रफद यांना बोलावून घेतले. ते औरंगाबादहून आल्यानंतर सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास या दोन्ही कुटुंबियांमध्ये पुन्हा वाद झाला. यात सय्यद मुजीब व शेख रफद यांनी त्यांच्याकडील गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात शरीफ, जमील व फरीद हे तिघे जखमी झाले. जमील याच्या छातीला, तर फरीदच्या हाताला एक गोळी चाटून गेली. तसेच एक गोळी आकाशात, एक खाली जमिनीत यांसह आणखी एक अशा पाच गोळ्या झाडल्याची चर्चा घटनास्थळी होती.

या गोळीबारानंतर दोघेही पळून जाताना ते रस्त्यावर पडल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांना पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. सर्व जखमींना तातडीने येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेख रफद शेख रशीद (वय 26, रा. औरंगाबाद), सय्यद मुजीब सय्यद मैनोद्दीन (वय 32, रा. अन्सार कॉलनी, गट 6, प्लॉट नं. 9, पढेगाव, ता.जि. औरंगाबाद) अशी आरोपींची, तर शरीफ रशिद शेख, जमील रशिद शेख, फरीद रशिद शेख (रा. हुसेननगर, वार्ड नं. 1, श्रीरामपूर) अशी जखमींची नावे आहेत.

दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांना एका गोळीचे आवरण मिळाले, तर गावठी कट्टा व अन्य हत्यारांचा शोध सुरू आहे. तसेच आरोपींबरोबर आणखी कोण साथीदार होते, त्यांच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का? याचाही तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!