श्रीरामपूर तालुक्यात बिबट्यांचा धुमाकूळ

0

फटाके वाजवून उक्कलगावातून पिटाळले

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील भोकर, खोकर आणि टाकळीभाननंतर आता बिबट्याने आपला मोर्चा उक्कलगावात वळविला आहे. येथे ग्रामस्थांनी बिबट्याला फटाके वाजवून पिटाळून लावले. या बिबट्याच्या भीतीने येथील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांनी संगमनेर आणि अकोलेत धुडगूस घातला. यात अनेकांवर हल्ले केल्याने रात्रीच्यावेळी शेतकर्‍यांनी बाहेर पडणे बंद केले. या भागात काही ग्रामस्थांची झोप उडविल्यानंतर आता बिबट्याने श्रीरामपूर तालुक्यात धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. भोकर आणि खोकरमध्ये शेतात पाणी भरताना बिबट्या अनेकांनी पाहिला. टाकळीभानमध्येही घराजवळील गोठ्यातील शेळीचा फडशा फाडला. काही ठिकाणी कुत्रीही फस्त केली. या प्रकाराने या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

अशातच काल रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास उक्कलगावातील पटेलवाडी रस्त्यावरील लक्ष्मण सुखदेव थोरात यांच्या द्राक्ष बागेजवळील रस्त्यावर बिबट्या बसल्याचे काहींनी पाहिले. याची माहिती एकमेकांनी मोबाईलवरून दिली. काही तरूणांचा फटाके वाजवून तेथून या बिबट्याला पिटाळून लावले. त्यानंतर या बिबट्याचे एल.पी. थोरात यांच्या  वस्तीनजीक दर्शन झाले. तेथेही तरूणांनी फटाके वाजवून हुसकावून लावले. त्यानंतर हा बिबट्या शेजारीच असलेल्या कर्डिले यांच्या मकाच्या शेतात घुसला. तेथूनही रात्री उशारापर्यंत या बिबट्याला हाकलण्यासाठी तरूण कार्यरत होते.

LEAVE A REPLY

*