श्रीरामपुरात ‘बहुजन मोर्चा’चे धरणे आंदोलन

jalgaon-digital
1 Min Read

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात नोंदविला निषेध

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने केंद्र शासनाने होऊ घातलेल्या नागरिकत्व सुधार व राष्ट्रीय नागरिकत्वाची नोंद या कायद्याविरोधात धरणे आंदोलन करून निषेध केला. येथील गांधी पुतळा चौकात शांततेच्या मार्गाने धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनासाठी श्रीरामपूर शहरासह परिसरातील गावातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक सुरेश चौदंते म्हणाले की, हा कायदा फक्त हिंदू-मुस्लीम यामधील वादाचा नसून या कायद्यामुळे संपूर्ण भारतीयांना फार त्रास होणार आहे. इतर देशांतून आपल्या भारत देशात आलेले 19 लाख नागरिक फक्त मुस्लीमच नसून बहुसंख्य हिंदूच आहेत.

यामध्ये एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी म्हणजेच भटक्या विमुक्त जाती जमाती यांचाही समावेश आहे. हे सर्व लोक बांगलादेशसह इतर देशांतून स्थलांतरित झालेले असल्याने भारतीय केंद्र सरकार त्यांना भारतीय म्हणून स्वीकारण्यास तयार नाही म्हणजेच त्यांना नागरिकत्व देण्यास तयार नाही.

यामध्ये 19 लाखापैकी 14 लाख हिंदूच आहेत. त्यामुळे हा कायदा हिंदू-मुस्लीम वादाचा मुळीच नाही. या आंदोलनात मुस्लीम समाजाची मोठी संख्या होती.

यावेळी आर. एम. धनवडे, एन. एस. गायकवाड, आरपीआयचे अशोक बागुल, संतोष मोकळे यांनी आपले मनोगत व्यक्त करून या कायद्याचा निषेध केला. यावेळी आर. व्ही. मगर, रणपिसे, गोरख हिवराळे, प्रकाश अहिरे, सुगंधराव इंगळे, प्रताप देवरे, अर्जुनराव मोरे, दावीद गायकवाड उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *