श्रीरामपूर-बाभळेश्वर मार्ग देतोय अपघातास निमंत्रण!

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; उपाययोजना करण्याची मागणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – सतत वर्दळ असणार्‍या श्रीरामपूर-बाभळेश्वर रस्त्यावरील दत्तनगर, खंडाळा, नांदूर, यादवमळा, ममदापूर, राजुरी या ठिकाणच्या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, रस्त्यावर झुकलेल्या काटेरी बाभळी, रस्त्याच्या कडेला पडलेल्या कपार्‍या तर याच मार्गावरचे पूलही अरुंद झालेले झालेले आहेत. एकंदरीतच रस्त्याच्या अशा दुरवस्थेमुळे श्रीरामपूर-बाभळेश्वर मार्ग अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा श्रीरामपूर-बाभळेश्वर मार्ग सध्या प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. या मार्गावरून शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, अकोले, लोणी, कोल्हार या भागात जाणार्‍या एसटी बस मोठ्या प्रमाणात असतात. तसेच विद्यार्थी स्कूल बस, प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षा, जीप यांचीही वर्दळ असते. मात्र या रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे हा मार्ग अडचणीचा ठरत आहे. त्यातच सध्या ऊसतोडणी हंगाम सुरु असल्याने डबल टेलरच्या साहाय्याने धोकेदायक ऊस वाहतूक सुरु असते.

अशातच रस्त्यात पडलेले खड्डे, ठिकठिकाणचे धोकादायक पूल यामुळे अपघाताची संख्या वाढत आहे. तर या मार्गावर वळणाच्या ठिकाणी दिशादर्शक फलकही व चौकाच्या काही ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. याच रस्त्यावरील रांजणखोलकडे जाणार्‍या पाट मोरीजवळील पूल तसेच नांदूर जवळील अरुंद पूल धोकादायक बनला आहे. तर मार्गावर कळमकर फाटा येथे असलेल्या ओढ्यावर अद्याप पूल बांधण्यात आलेला नाही.

रस्त्याच्या कडेला पडलेल्या कपारी व रस्त्यावर झुकलेल्या काटेरी बाभळी व वाळलेली झाडे काढण्याचीही सार्वजनिक बांधकाम विभागाने तसदी घेतलेली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळेस या कपारीवरुन घसरुन अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहे. यामध्ये अनेकांना अपंगत्व तर काहींचा मृत्यूही झाला आहे.

दरम्यान, सध्या अनेक ठिकाणच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. मात्र श्रीरामपूर-बाभळेश्वर मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे या भागातील प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.त्यामुळे श्रीरामपूर-बाभळेश्वर मार्गाची अवस्था लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी श्रीरामपूर, नांदूर, खंडाळा, ममदापूर, राजुरी भागातील नागरिकांसह प्रवाशांमधून होत आहे.

दरम्यान, बाभळेश्वर ते नांदूर रस्त्याची 15 दिवसात दुरुस्ती न केल्यास ममदापूर येथील दलित मित्र शब्बीर कुरेशी व वाल्मिक म्हसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच ममदापूर, यादवमळा, नांदूर याठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघात घडतात. त्यामुळे याठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी त्यांनी केली आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *