व्यथा श्रीरामपूरची अपेक्षा जनतेची : श्रीरामपूरच्या पहिल्या उद्यानाची दुरवस्था

0
अतिक्रमण वाढले
श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरात सेंट्रल गोडाऊनच्या मागे व मराठा बोर्डिंग वसतिगृहासमोर 15 वर्षांपूर्वी नागरिकांच्या सोयीसाठी बगीचा तयार करण्यात आलेला होता. हा बगीचा म्हणजे जिल्ह्यात नाही असा सुंदर बगीचा होता. मात्र गेल्या चार पाच वर्षापासून या बगीच्याची दुरवस्था खूपच वाईट झाली आहे.
या ठिकाणी काहींनी आपले संसारही थाटले आहेत तर त्याचा दुरुपयोगही वाढला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवत वाढले असून सर्व झाडे सुकली आहेत. तसेच तहसील समोर बांधण्यात आलेल्या बगीच्यातही गवत वाढले असून त्याची निगाही राखली जात नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी जुना बगीचा पुन्हा तयार करण्यात आला तर पुन्हा श्रीरामपूरच्या वैभवात भर घालणारे ते ठरेल!
जिल्ह्यात कुठेच नाही असा बगीचा पंधरा वर्षापूर्वी उभारण्यात आला होता. सर्वच प्रकारची झाडे या बगिच्यात होती, लहान मुलांची खेळणी होती. दिवसभराचा कामाचा थकवा दूर करण्यासाठी या ठिकाणी आले म्हणजे प्रसन्न वातावरण होते. सर्वच ठिकाणी नाविन्यपूर्ण झाडे अगदी लाईनशीर आणि मनाला शोभेल असा हा बगिचा तयार करण्यात आला होता. या बगिच्याचे वैभव त्यानंतर चार पाच वर्षे चांगले राहिले परंतु नंतर नंतर त्या ठिकाणी दुर्लक्ष झाले. त्यावेळच्या सत्ताधार्‍यांक़डून त्या बगीच्याची निगा राखता आले नाही.
तेथे वॉचमनही नव्हता. त्यामुळे अन्य लोकांनी त्या ठिकाणी अतिक्रमण केले. त्या ठिकाणी तर काहींनी संसार थाटले तरी पालिका सत्ताधार्‍यांनी काहीच कारवाई केली नाही. झाडे पूर्णपणे वाळली गेली. सर्व भिंती व खोल्या पडक्या झाल्या. त्या ठिकाणी विचित्र प्रकार पहावयास मिळाले. अनेकवेळा मागणी करुन त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले त्यामुळे हा सुंदर असा बगीचा पूर्णपणे मोडकळीस आला. त्यामुळे या ठिकाणी पूर्वीचे एक श्रीरामपुरातील वैभव संपुष्टात आले.
त्यानंतर पाच ते सहा वर्षापूर्वी जुन्या तहसील कार्यालयासमोर संत गाडगे महाराज उद्यान नावाचा बगीचा उभारण्यात आला. त्या ठिकाणी चांगली सुविधा करण्यात आली होती. लहान मुलांसाठी खेळणी उभारण्यात आले होते. या ठिकाणीही काही दिवस चांगली निगा राखण्यात आली. परंतु मध्यंतरीच्या काळात या ठिकाणी गवत वाढण्याचा प्रकार जास्त झाला. वॉचमनची व्यवस्थाही नव्हती.
त्यामुळे बगीचातील झाडे अस्ताव्यस्त वाढली गेली. वॉचमनची व्यवस्था नसल्याने या ठिकाणी गैरप्रकार वाढू लागले होते. ज्यांना हा बगीचाची निगा राखण्यासाठी बगीचा चालविण्यास देण्यात आला आहे त्यांच्याकडून दुर्लक्ष होता कामा नये याची काळजी पालिकेकडून घेतली जावी.
आणखी काही या बगीच्यात सुधारणा करता आली तर नक्कीच श्रीरामपूरच्या वैभवात भर पडणारा हा बगीचा ठरू शकेल. तसेच जुना बगीच्यातील अतिक्रमण काढून पुन्हा हा बगीचा पूर्वीप्रमाणे उभारला तर नक्कीच नागरिकांच्या सोयीसाठी आणि आनंदात भर टाकणारी ठरु शकेल. यासाठी पालिकेने पुन्हा एक़दा नव्या जोमाने यासाठी पुढाकार घ्यावा.

 

LEAVE A REPLY

*