श्रीगोंदा तालुक्यात जोरदार पाऊस

0

लिंपणगाव (वार्ताहर) – श्रीगोंदा तालुक्यात तब्बल तीन महिन्यानंतर पाऊस सुरू झाल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रब्बी हंगामासाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. मात्र मिळेल त्या किमतीत खरीप हंगामातील पिके हाती लागावीत म्हणून बी-बियाणे खरेदी केली; परंतु पाऊस वेळेत न पडल्यामुळे मशागतीचा व बियाण्यांचा खर्च वाया गेला. आता शनिवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पाऊस पडावा म्हणून तालुक्यात अनेक गावांमध्ये यज्ञ, सुक्तवाचन व ग्रामदैवताला साकडे असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करून तालुक्यात कृपावृष्टी होऊ दे असे मागणे मागण्यात आले. उशिरा का होईना परंतु पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंदाश्रू पहावयास मिळत आहेत.

तालुक्यात पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्‍न अत्यंत गंभीर बनला होता. दहा दिवसानंतर सर्वत्र पाण्याचे टँकर सुरु करण्याची वेळ येऊन ठेपली होती. याचा फटका कुकडी लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बसला गेला. खरीप हंगाम भुईसपाट झाल्यानंतर कुकडीचे आवर्तन तालुक्यात सोडण्यात आले. शेतकरी पाणी पाणी करत असताना घशाला कोरड पडली. परंतु कुकडीच्या पाण्याचे नियोजन जलसंपदा विभागास करता आले नाही. ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. आता पाणी सोडले परंतु पिकेच नाहीत तर पाणी कशाला द्यायचे असा सवाल खरेदी-विक्री संघाचे संचालक शरद कुरूमकर यांनी केला आहे. तर रब्बी हंगाम यशस्वी होण्यासाठी वरुणराजानेच कृपादृष्टी करावी अशी सद्भावना शेतकरी वर्गातून होत आहे.

LEAVE A REPLY

*