श्रीगोंदा तालुक्यात दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकूळ

0

बेलवंडीतील शिंदेवाडी येथे दरोडा; दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यात दरोडोखोरांनी पुन्हा एकदा धुमाकूळ सुरू केला आहे. दरोडा टाकताना मध्ये येणार्‍यांना मारहाण करून जखमी केले जात असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
दरोडेखोरांनी तालुक्यातील बेलवंडी गावातील शिंदेवाडी येथे दरोडा टाकून संदीप भानुदास शिंदे यांच्या घरातून सोन्याची दागिन्यांसह 31 हजार 400 रुपयांचा ऐवज लुटून नेला. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत बेलवंडी पोलिसांनी जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील शिंदेवाडी येथे राहणारे संदीप भानुदास शिंदे यांच्या घरावर बुधवारी रात्री 2 वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी दरोडा टाकला. संदीप शिंदे यांच्या आजी इंदूबाई लहानू शिंदे या ज्या खोलीत झोपल्या होत्या. त्या खोलीमध्ये दरोडेखोरांनी प्रवेश केला. दरोडेखोरांच्या आवाजाने इंदूबाई शिंदे या जाग्या झाल्या असता दरोडोखोरांनी त्यांच्या डोक्यात काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. यानंतर घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्याच्या दागिन्यांसह 31 हजार 400 रुपयांचा ऐवज लुटून नेला.
याबाबत संदीप शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इंदूबाई यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरोडा पडल्याची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश हिवरकर हे करीत आहेत.

दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी –
तालुक्यातील ग्रामीण भागात दरोडोखोरांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या दरोडेखोरांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी करून पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

*