महिलेशी असभ्य वर्तन : साई समाधी मंदिर प्रमुखावर गुन्हा

0
शिर्डी (प्रतिनिधी) – साई दर्शनाला मंदिरात आलेल्या एका प्रतिष्ठित महिलेस मंदिर प्रमुखाने धक्काबुक्की करून व असभ्य वर्तन करत मंदिराबाहेर हाकलून लावले. महिलेच्या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी मंदिरप्रमुख राजेंद्र जगताप यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना गुरुवारी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास साईबाबा मंदिरात घडली. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, राहाता येथील एक महिला, तिचे नातेवाईक व मैत्रीणीसोबत साई मंदिरात दर्शनाला गेली होती. दर्शन घेण्यासाठी

ती गाभार्‍यात उभी असताना मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप तेथे आले व म्हणाले, यांना इथे कशाला थांबवता, यांना बाहेर हाकलून द्या. तुम्ही थर्ड क्लास आहात, तुमची मंदिरात यायची लायकी नाही, असे म्हणत असभ्य वर्तन करून मंदिर गाभार्‍याबाहेर काढले. परत आत आला तर मार खाल, अशी धमकीही दिली.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम 354, 323, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मंदिरात साईभक्तांना हीन वागणूक – मंदिरात दर्शनाला आलेल्या सर्वसामान्य भक्तांना कर्मचार्‍यांकडून अपमानास्पद वागणूक मिळते, तर धनिक व वशिल्याच्या व्हीआयपींना थेट समाधीजवळ जागा मिळते. हे प्रकार नेहमीच घडत असतात. यापूर्वीही मंदिरातील धक्काबुक्कीवरून मंदिर प्रमुखाविरुध्द शिर्डी ग्रामस्थांनी आंदोलन केले आहे.

 

LEAVE A REPLY

*