अहमदनगर(कर्मयोगिनी) | श्रावणी संजय बोलगे : कवितेच्या श्रावणसरी!

0

अहमदनगर.
लॉ कॉलेज पुणे
कार्य – विविध काव्य संमेलनांत सहभाग. ‘बाई मातीच्या कविता’ ही कविता पोहोचविण्यासाठीची अभिनव चळवळ, गट : साहित्य

शाळा-कॉलेजात जाणार्‍या प्रत्येकालाच वाचता येतं. परंतु मोजक्याच लोकांना लिहण्याची कला अवगत असते. तसे लिहितात खूपजण. मात्र, त्यांचं लोकांना समजेलच असं नाही. ज्यांना हदयाची भाषा समजते, त्यांच्याच लिखाणाला अर्थ असतो. बाकी सारा शब्दांचा पसारा. लोक साहित्याला सरस्वतीचं लेणं म्हणोत किंवा अन्य काही. ही लेखन कला ज्यांना लाभली, त्यांची यादी लंबीचौडी. या लोकांच्या पंगतीतील आश्‍वासक नाव म्हणजे श्रावणी संजय बोलगे. ही अहमदनगरची कवयित्री. पुण्यात लॉ करते. साहित्याशी निगडित शाखेतून तिचं पूर्वशिक्षण झालेलं नसतानाही ती काव्यक्षेत्राकडे वळली आणि पाहतापाहता ठसठशीत ओळखही.

दिसामाजी काही तरी लिहित जावे… असे समर्थ रामदास स्वामींनी केव्हाच लिहून आणि सांगून ठेवलंय. परंतु त्याचे कोणीच पालन करीत नाही. ज्यांना स्वतःशी संवाद साधायची कला जमते तेच लोक काही ठोस करू शकतात. समाजातील बहुतांशी लोक या यशाच्या राजमार्गाकडे कानाडोळा करतात. मग यशही त्यांचा नाद सोडून देेते. साहित्य समाजाकडे पाहण्याची दृष्टी तर देतेच परंतु ते आंतरात्म्यातही डोकावण्यासाठी नजर देते.

श्रावणी बोलगे ही कवयित्री आहे, अवघ्या चौदा वर्षांची. आपल्या शिक्षणाशी निगडीत प्रांत नसतानाही ती कविता करते. यामागे आहे तिचं बालपण. घरात आईबाबांसह आजीआजोबांनी तिच्यात वाचनाचे संस्कार पेरले. म्हणतात ना पेराल तेच उगवतं. श्रावणीबाबतही तसंच झालं. आजोबांनी तिच्यात जाणीवपूर्वक वाचनाचे संस्कार रुजवले. बाल श्रावणी ऐकत गेली, ऐकत गेली आणि एक दिवस लिहिती झाली.

तिचं पहिलं लिखाण म्हणजे काय होतं तर कविता. शाळा… शाळेवर तिने काव्यलेखन केलं होतं. तिची ही पहिली कलाकृती सर्वांनाच भावली. आजोबांसह सर्वांनीच तिला शाबासकी दिली. मग काय कौतुकाचं टॉनिक मिळाल्यावर श्रावणीला आणखी हुरूप आला. यातूनच एकेक कविता हाती लागत गेल्या. शाळेच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये ती जणू काही सेलिब्रिटी झाली.

अभ्यास, शाळा आणि कविता असं तिच्या जगण्याचं सूत्र झालं. तिसरीत आल्यापासून तिला कळालं होतं की कविता काय असते. बालसुलभ वयातील कविताही तशाच. पण या कवितेला खरा अर्थ आला तो कॉलेज जीवनात. या बहराच्या काळात कविताही बहरली. या बहराच्या काळात प्रतिभेला धुमारे फुटतात. तसेच श्रावणीचेही झाले.

एकंदरीत काय तर तिने कवितेला सिरियसली घेतलं. माणसाला आजू-बाजूला घडणार्‍या घटना जेव्हा सिरिअर करतात तेव्हाच माणूस गंभीर होतो. हे गांभीर्य दुःखाचा कोपरा शोधायला मदत करतं. परंतु कवीचं एक असतं. त्याला स्वतःच्या दुःखाऐवजी समाजाची वेदना महत्त्वाच्या वाटतात आणि असह्य झालेल्या वेदना म्हणजेच कविता. किंवा विरोधाभासी भाषेत सांगायचं झालं तर कवितेच्या कुपीत बुडवून काढलेले शब्द म्हणजेच सुखाचं अत्तर. हा अत्तराचा फाया वाचणार्‍या प्रतिभावंताला नेहमीच मोहीत करून टाकतो.

कविता लिखाणाबद्दल श्रावणीची स्वतःची काही मतं आहेत. त्या मतांवर ती ठाम असते. हा ठामपणा आला तो विचारांतूनच. काही तरी मनात भरावं लागतं. हदय फाटावं लागतं, अश्रू आटावे लागतात, संध्याकाळचे वारे अस्वस्थ करून जायला हवे. स्पंदनाची वादळे नसानसातून जावी लागतात. तेव्हा कुठे सुरु होतो कवितेचा किंवा लिखाणाचा प्रवास, साहित्याबद्दल श्रावणीचं असं मत आहे.

विशेष म्हणजे तिचा अद्यापि एकही कविता संग्रह प्रकाशित झालेला नाही. तरीही तिचं नाव साहित्यवर्तुळात रुंजी घालायला लागलंय. ख्यातनाम कवी संजय बोरुडे यांनी ‘बाईमातीच्या कविता’ नावाने एक चळवळ सुरू केली आहे. त्यात श्रावणीही आहे. रचना, स्वाती पाटील यांच्यासारख्या दिग्गज कवयित्रींसोबत ती धीटपणे कविता सादर करते. बाई आणि माती हा तिच्या कवितेचा विषय आहे, मात्र, त्याचं सूत्र आहे ते प्रेम.

कवितेच्या क्षेत्रात आणखी मोठा पल्ला गाठायचाय. कायद्याची पुस्तकं चाळता चाळता फायद्याचा विचार करायला लावणारा सल्ला देणारी माणसंही भेटतात. पण घरातील साहित्याचे संस्कार धीर धरायला मदत करतात. वडील डॉ. संजय यांचाही मोठा पाठिंबा आहे. समाजात आजही बाईला दुय्यम स्थान आहे. त्या माती होणार्‍या बाईच्या जीवनाला मोल देण्याचं काम कवितेच्या माध्यमातून श्रावणी करीत आहे. तिच्या या शब्दांच्या श्रावणसरी अशाच बहरत राहाव्यात आणि त्याला तृप्तीचा मृदगंध यावा..

LEAVE A REPLY

*