Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अकोलेत श्रमिकांच्या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू

Share

आंदोलनाच्या समर्थनार्थ 27 रोजी काढणार आक्रमक मोर्चा

अकोले (प्रतिनिधी) – श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयाच्या वतीने किसान सभा, सिटू कामगार संघटना व डीवायएफआय युवक संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. वन जमीन, घरकूल, पिण्याचे पाणी व बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडो श्रमिक सहभागी झाले आहेत. आंदोलनातील मागण्यांच्या समर्थनार्थ गुरुवार, दिनांक 27 जून रोजी अकोले तहसील कार्यालयावर अत्यंत आक्रमक मोर्चा काढण्यात येणार आहे. ऐतिहासिक शेतकरी संपाच्या द्वितीय वर्धापनदिनाच्या निमित्त 1 जून रोजी काढण्यात आलेल्या मोर्चात संघटनांच्यावतीने अनेक मागण्या केल्या होत्या. मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास 27 जूनपासून अकोले तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता. मोर्चाला 27 दिवस पूर्ण होऊन गेल्यानंतरही मागण्यांची अंमलबजावणी न केल्याने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
अकोले, संगमनेर, कोपरगाव तालुक्यातील बांधकाम कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांच्या लाभासाठी बांधकाम कामगारांच्या हजारो फायली आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. फायलींची दखल घेऊन लाभार्थींना तातडीने लाभ द्यावा, रुंभोडी गावातील शेतकर्‍यांच्या हद्दीत वन विभागाने अतिक्रमण करून शेतकर्‍यांच्या मालकी हक्काच्या जागेत अतिक्रमणे केली आहेत. वन खात्याच्यावतीने केलेली ही अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावीत. पंतप्रधान आवास योजनेतून वंचित राहिलेल्या सर्व वंचितांचा यादीत समावेश करावा, बेलापूर येथील आदिवासींचा अडविलेला रस्ता मोकळा करावा, हिवरगाव येथील ठाकरवाडीला पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करा, वन जमिनीवरून आदिवासींना हुसकावून लावण्याचे कारस्थान तातडीने थांबवा या मागण्या आंदोलनात करण्यात येत आहे.

आंदोलनाची दखल घेत तहसीलदार मुकेश कांबळे, वन परिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री पोले, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे व अकोले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी आंदोलकांची भेट घेतली. सविस्तर चर्चा करून मागण्या समजून घेतल्या. बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार आयुक्त अहमदनगर यांनी तातडीने लेखी पत्र पाठविले. येत्या दोन दिवसात या सर्व मागण्यांबद्दल कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी आश्‍वासन दिले आहे. मात्र तरीही केवळ आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवून आंदोलन मागे घेतले जाणार नाही, प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.

तालुक्यात मान्सूनचे आगमन झाले असून भर पावसात हे आंदोलन सुरू आहे. किसान सभेचे प्रदेश सचिव कॉ. डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, शांताराम वारे, संदीप शिंदे, भाऊपाटील मालुंजकर, सीताबाई गोपाले, संजय पवार, नंदू गावंडे, मंदा मुंगसे, हरीश धोंगडे, बाळशीराम बर्डे, एकनाथ बर्डे, दिलीप हिंदोळे, बाळू मधे, वाळीबा मेंगाळ, नामदेव बांडे आदी कार्यकर्ते या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!