Type to search

Featured सार्वमत

खांबावर काम करताना शॉक बसून कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू

Share

नेवासा तालुक्यातील बेलपांढरी फाट्यावरील घटना; उपकार्यकारी अभियंता व ठेकेदारावर गुन्हा दाखल

बेलपिंपळगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील साईनाथनगर शिवारात बेलपांढरीफाट्याजवळ विजेच्या खांबावर काम करत असलेल्या कंत्राटी वीज कामगाराचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून नेवासा उपकेंद्राचे उपकार्यकारी अभियंता, व ठेकेदारावर सदर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याबाबत प्रकाश आबासाहेब घोरपडे (वय 25) रा. बहिरवाडी ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, त्यांचा चुलतभाऊ नितीन राजेंद्र घोरपडे (वय 24) रा. बहिरवाडी ता. नेवासा हा नेवासा बुद्रुक येथील महावितरणच्या 132 केही वीज उपकेंद्रात कंत्राटी पद्धतीने चार वर्षांपासून लाईनमन म्हणून कार्यरत होता.

14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता फोनवर सरपंच नंदकुमार वाखुरे यांनी तुझा भाऊ नितीन हा बेलपांढरी फाटा येथील लाईटचे काम करत असताना पोलला चिकटला असल्याचे कळविले. त्यावरून मी गणेश कचरु घोरपडे, सुनील शिवाजी हदे असे सदर ठिकाणी पोहचलो असता बेलपांढरी फाट्याजवळील मेन रोडच्या बाजूला 33 केव्ही एबी स्विचच्या पोलवर माझा भाऊ लटकलेल्या अवस्थेत दिसला. हे पाहून महावितरणमधील कंत्राटी पद्धतीने काम करणारी व्यक्ती (नाव माहित नाही) याने त्याच्या मोबाईलवरून महावितरण कार्यालयात समक्ष फोन करून घटनेची माहिती देऊन वीजप्रवाह बंद करण्यास सांगितले. सदर व्यक्ती माझ्या भावाला पोलवरून खाली उतरवण्यासाठी पोलवर चढला असता त्याला विद्युत प्रवाह चालू असल्याचे जाणवले. म्हणून तो खाली उतरला. त्यानंतर याठिकाणी एमएसईबीचे चार ते पाच कर्मचारी आले.

खांबावर वीज प्रवाह चालू असल्याने त्याला अर्थिंग लावून सदर विद्युत प्रवाह बंद करून दोरीच्या सहाय्याने माझ्या भावाला जमिनीवर उतरवले. त्याच्या शरीराची पाहणी केली असता त्याच्या उजव्या पायाच्या घोट्यापासून पोटरीच्या भागापर्यंत शॉक बसून मास जळालेले दिसत होते. तसेच त्याच्या उजव्या मांडीवर व पाठीवर शॉक बसून जखमी झालेला दिसत होता. त्याचे नाकातून व तोंडातून पांढरा द्रव पदार्थ बाहेर आलेला दिसत होता. त्याचे पूर्ण शरीर लालसर दिसत होते. माझा भाऊ 132 केव्ही नेवासा बुद्रुक उपकेंद्रात कंत्राटी पद्धतीने ठेकेदार दत्तात्रय झिंजुर्डे यांचेकडे कामाला होता. त्याला कामाची पूर्ण माहिती नसातानाही 132 केव्ही उपकेंद्रातील उपकार्यकारी अभियंता व ठेकेदार झिंजुर्डे यांनी त्याला विद्युतप्रवाह बंद न करता बेलपांढरी फाट्यावर विद्युत खांबावर काम करण्यासाठी पाठविले. त्यात त्याचा खांबावर विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.

आज दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान माझा चुलत भाऊ नितीन राजेंद्र घोरपडे (वय 24) रा. बहिरवाडी ता. नेवासा हा उपकार्यकारी अभियंता अशोक जाधव व ठेकेदार दत्तात्रय झिंजुर्डे यांच्या सांगण्यावरून बेलपांढरी फाटा येथील विजेच्या खांबावर काम करण्यास गेला असता श्री. जाधव यांनी सदर खांबावरील वीजप्रवाह बंद केला आहे असा विश्वास ठेवून खांबावर काम करण्यास चढला असता शॉक लागून मरण पावला. अशोक जाधव व झिंजुर्डे यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे यापूर्वीही माझ्या गावातील तिघांचा विजेच्या शॉकने मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. माझ्या भावाचाही त्याच हलगर्जीपणामुळे शॉक लागून मृत्यू झाला आहे. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट 230/2019 भारतीय दंड विधान कलम 304 (अ), 34 प्रमाणे उपकार्यकारी अभियंता अशोक जाधव व ठेकेदार दत्तात्रय झिंजुर्डे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल जे. एन. आव्हाड करत आहेत. मयत नितीन घोरपडे याच्या पश्चात 1 भाऊ, 1 बहीण, आई, वडील असा परिवार आहे.

नियमानुसार मदत मिळवून देऊ; अधिकार्‍यांचे पत्र
दरम्यान महावितरणच्या नेवासा कार्यालयातील अधिकार्‍यांनी मयत नितीनचे वडील राजेंद्र साईराम घोरपडे यांना साध्या कागदावर लेखी पत्र दिले असून त्यात त्यांना नियमानुसार स्पेशल केसमधून शासकीय भरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही बांधील आहोत असे म्हटले आहे. पत्रात म्हटले की, नेवासा बुद्रुक गावठाण फिडर बेलपांढरी टॅप (कट पॉईंट) च्या एबी स्वीच बसवत असताना व सदर लाईनचे परमीट घेतले असताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास 11 केव्ही लाईनमध्ये इंडक्शन आले व नितीन घोरपडे यांना प्राणांतिक अपघात झाला. सदर अपघातास 132 नेवासा उपकेंद्राचे उपकार्यकारी अभियंता अशोक जाधव व लाईनमन पटेल तसेच ठेकेदार झिंजुर्डे हे जबाबदार आहेत. नितीन घोरपडे यांच्या वारसांना महावितरण कंपनीतर्फे मिळणारी शासकीय रक्कम ही नियमानुसार स्पेशल केसमध्ये ताबडतोब वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात येईल व ती रक्कम त्यांना मिळून देण्यास आम्ही सर्व अधिकारी बांधील आहोत. पत्रावर महावितरण नेवासा ग्रामीण-2 चे प्रभारी सहाय्यक अभियंता, नेवासा उपविभागाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता यांच्या सह्या आहेत.

मृतदेह एक-दीड तास लटकलेलाच!
बेलपिंपळगाव गावठाण सिंगल फेजचे काम करण्यासाठी हा कामगार खांबावर चढला होता. परंतु त्या खांबावरील तारांमध्ये वीज प्रवाह सुरूच राहिल्याने तो खांबावरच तारेला चिकटला व त्यात त्याचा मृत्यू झाला. एक-दीड तास मृतदेह उलट्या अवस्थेत खांबावरच लटकत होता. या काळात वीज वितरणचे कोणीही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले नाहीत. श्रीरामपूर-नेवासा रोडलगतच ही घटना घडली असल्याने येथे जाणार्‍या येणार्‍यांची मोठी गर्दी झाली होती.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!