Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९ सार्वमत

बाजीप्रभू स्वराज्यासाठी लढले, आताचे खुर्चीसाठी लढताहेत

Share

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रदेशाध्यक्ष थोरातांवर निशाणा

संगमनेर (प्रतिनिधी) – बाजीप्रभू देशपांडे आणि तुमची तुलना कधीच होऊ शकत नाही. त्यांनी स्वराज्यासाठी खिंड लढवली. राजे गडावर पोहोचल्यानंतर त्यांनी स्वत:चे प्राण सोडले. थोरात साहेब तुम्ही आता निवांत घरी जायला हरकत नाही. कारण तुमचे नेते बँकॉकला पोहोचले आहेत. धगधगते निखारे आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे तुमचा विस्तवदेखील पेटणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्यावर टीकास्त्र सोडले.

संगमनेर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या निवडणूक प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील निवडणूक प्रचाराची पहिलीच सभा प्रदेशाध्यक्षांच्या गावात घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. गृहनिर्माण मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस तेजस ठाकरे, मिलींद नार्वेकर, खा. सदाशिव लोखंडे, खा. डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, अकोल्याचे भाजपाचे उमेदवार वैभव पिचड, सेनेचे उमेदवार साहेबराव नवले, भाजपाचे सरचिटणीस जालींदर वाकचौरे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, रविंद्र बिरोले, शाळीग्राम होडगर, जनार्दन आहेर, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सुरेखा गव्हाणे, बाबासाहेब कुटे, कैलास वाकचौरे, संतोष रोहम, जयवंत पवार, आप्पा केसेकर, डॉ. अशोक इथापे, अ‍ॅड. श्रीराज डेरे, शौकत जहागिरदार, अमर कतारी, पप्पु कानकाटे, अशोक सातपुते, संजय फड, काशिनाथ पावसे, सुधाकर गुंजाळ, राजेश चौधरी, राजेंद्र सांगळे, अ‍ॅड. दिलीप साळगट, रभाजी खेमनर, कैलास कासार, नरेश माळवे, शितलताई हासे, मिराताई नवले, पुजा दिक्षीत, ललिता आहेर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोरातांच्या अधिपत्याखाली असलेल्या सह्याद्री शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक रघुनाथ सतुजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आप्पासाहेब शिंदे, मंगेश आप्पासाहेब शिंदे, पवन आप्पासाहेब शिंदे, राहुल रामराव शिंदे, रामनाथ नाना वाळुंज यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ही निवडणूक तुमच्या भविष्याची आहे. समोरच्या पक्षाचे दहासुद्धा आमदार निवडून येणार नाही. जे निवडून येतील ते तुमच्या पक्षात राहातील का? याचा विचार करा. दोन्ही काँग्रेस आता खाऊन-खाऊन थकले आहेत. त्यामुळे मतदान विचारपूर्वक करा, असे आवाहन करुन त्यांनी सांगितले की, निवडणूक म्हणजे तमाशाचे फड नाही तर तुमचे आयुष्य घडविणारे आहे. विकास साधायचा असेल तर युतीचे सरकार हवे आहे. त्यामुळे परिवर्तन झाले पाहिजे. संगमनेरला ‘नवल’ घडवून दाखवले पाहिजे.

राज्य सरकारने पाच वर्षाची एक टर्म पूर्ण केली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम सरकारने केले आहे. सरकारच्या कामाला कुठेही कलंक लागला नाही. त्यामुळे राधाकृष्ण विखेंनी महायुतीच्या परिवारात प्रवेश केला तो सरकारच्या कामावर विश्वास ठेवूनच. दोन्ही काँग्रेसमध्ये काय चालले आहे हे धाडसीपणाने ते सांगू शकतात. याकडे लक्ष वेधून उद्धव ठाकरे म्हणाले, की सरकारच्या माध्यमातून या भागाला आम्हीच पाणी देणार आहोत. पाण्यामध्येच विकासाचे प्रतिबिंब दिसेल. सुशिलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही एकत्र येणार असाल, तर तुमचा नेता कोण? कारण सोनिया गांधी विदेशी आहे. या मुद्द्यावर पवार काँग्रेस पक्षातून बाहेर पडले होते.

आता शरद पवार पुन्हा काँग्रेसचे नेतृत्व स्विकारणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे राज्य दुष्काळमुक्त करण्याचे धोरण सरकारने हाती घेतले आहे. हा तालुका सुद्धा आम्हाला दुष्काळमुक्त करायचा आहे. गेली अनेक वर्षे केवळ पाणी प्रश्नावर राजकारण केले गेले. गोड बोलून गुदगुल्या केल्या गेल्या. अनेक वर्षे मंत्रीपदावर राहूनही हा तालुका ज्यांना टँकरमुक्त करता आला नाही. त्यांनीच समन्यायी पाणी वाटपचा मसुदा विधीमंडळात मांडून या जिल्ह्याचे हक्काचे पाणी बाहेर जावू दिले.

विधिमंडळात विरोधी पक्षनेता म्हणून मी काय केले असे विचारणार्‍या काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी मागील पाच वर्षात सभागृहात बोलण्याची तसदी देखील घेतली नाही, अशी टीका केली. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. खा. सदाशिव लोखंडे, उमेदवार साहेबराव नवले यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन चंद्रकांत घुले यांनी केले. यावेळी अरुण इथापे, सुरेखा गुंजाळ, ज्योती भोर, मेघा भगत, कांचनताई ढोेरे, अमोल कवडे, भाऊसाहेब हासे, अमित चव्हाण, अमोेल डुक्रे, विकास डमाळे, अक्षय बिल्लाडे, राजु सातपुते, रमेश काळे आदींसह सभेस हजारोंच्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महायुतीचा धर्म पाळावा
संगमनेर -अकोले तालुक्यात कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळावा. जे इच्छुक होते त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही, पण पक्ष प्रमुख म्हणून तो माझा निर्णय आहे. तेव्हा आता अकोले विधान सभेचे महायुतीचे उमेदवार वैभव पिचड आहेत. तर संगमनेरचे उमेदवार साहेबराव नवले आहेत. तेव्हा कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळावा असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तब्बल 15 वर्षांनी सभेच्या निमित्ताने एका व्यासपीठावर आले. भाषणाच्या सुरुवातीलाच याची आठवण करून देत, उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. बाळासाहेब विखे पाटील यांची मला आज आवर्जून आठवण होत असल्याचा दाखला देऊन ते म्हणाले की, दोन पिढ्यांनी बरोबर काम केले. आता तिसरी पिढीही एकत्रितपणे काम करीत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!