Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिवसैनिकांनी बंद पाडला पिंपरी निर्मळचा टोलनाका

Share

नगर-शिर्डी-कोपरगाव रस्त्याची आधी पूर्ण दुरुस्ती, नंतरच टोल वसुली

राहाता (तालुका प्रतिनिधी) –  नगर-कोपरगाव महामार्गाच्या दुरुस्तीसाठी संतप्त शिवसैनिकांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली या मार्गावरील पिंपरी निर्मळ येथील टोल नाका बंद पाडला. जोपर्यंत रस्ता पूर्ण दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोल चालू देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

नगर-शिर्डी-कोपरगाव या महामार्गाची प्रचंड दैना झाली असून सर्व मार्ग खड्ड्यात हरवला आहे. या मार्गावर वारंवार अपघात घडून अनेकांचे बळी जात असताना या मार्गाची दुरुस्ती न करता केवळ टोल वसुली केली जाते. वारंवार मागणी करूनही दुरुस्तीकडे कानाडोळा करणार्‍या सुप्रिम कंपनी विरोधात नागरिक, साईभक्त व प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती.

नागरिकांच्या तक्रारीची शिवसैनिकांनी दखल घेत खा. सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रथम राहाता तहसील कार्यालयात जाऊन धरणे आंदोलन केले. यावेळी शिवसेना नेते प्रमोद लबडे, नितीन औताडे, कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, राजेंद्र पठारे, अक्षय तळेकर, धनंजय गाडेकर, ज्ञानदेव पवार, अमोल गायके, अनिल बांगरे, पुंडलीक बावके, दिनेश आसने, राजेंद्र देवकर, गणेश सोमवंशी, अशोक गोंदकर, राहुल गोंदकर, अनिल पवार, गंगाराम कांदळकर, बाळासाहेब पवार, संभाजी पेरणे, सनी वाघ, सागर कोते, शुभम ताम्हाणे, किरण जपे, दिनेश पवार यानी धरणे आंदोलन करत प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे, जागतीक बँक प्रकल्प अधिकारी ए. जी. मेहेत्रे यांना निवेदन देत जोपर्यंत महामार्ग दुरूस्त होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करावी तसा आदेश द्यावा, अशी मागणी सर्व शिवसैनिकांनी केली. त्यानंतर खा. लोखंडे यांनी शिवसैनिकांसह पिंपरी निर्मळ येथे जात स्वतः टोलनाक्याला टाळे ठोकले व काही वेळ तेथे बैठा सत्याग्रह केला.

यावेळी खा लोखंडे म्हणाले, नागरिकांना चांगला रस्ता मिळावा म्हणून टोल आकारला जातो. मात्र या मार्गावर केवळ टोल आकारला जात असून रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. दोन महिन्यात या मार्गावर खड्ड्यामुळे पाच जणांचे बळी गेले. याला जबाबदार कोण? नगर ते कोपरगाव रस्ता व शिर्डी बाह्यवळण रस्ता तातडीने दुरूस्त करा मगच टोल सुरू करा. जोपर्यंत रस्ता खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत टोल सुरू करू देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

तसेच तहसिलदार, कृषी अधिकारी व विमा कंपनी अधिकारी यांनी सर्व शेतकर्‍यांचे पंचनामे करावे. शेतात व खळ्यात पडलेल्या सोयाबीनचे वेगळे पंचनामे न करता सरसगट पंचनामे करून हतबल शेतकर्‍याला मदत करण्याचे अहवान केले. तसेच राहाता तालुक्यातील पेरू व फळबागांचेही पंचनामे करावे तसेच चारा पिकांचेही पंचनामे करा, अशा सुचना लोखंडे यांनी केल्या. विमा कंपनीचा एक अधिकारी शेतकर्‍यांची अडवणूक करतो, अशा तक्रारी शेतकर्‍यांनी करताच त्या अधिकार्‍याला खा. लोखंडे यांनी शिवसेना स्टाईलने फटकारले. यावेळी शिवसेना उप जिल्हा प्रमूख प्रमोद लबडे कमलाकर कोते राजेंद्र पठारे व नितीन औताडे यांची भाषणे झाली.

सुप्रिमचा टोलनाका बंद पाडला
खासदार लोखंडे व संतप्त शिवसैनिकांनी थेट पिंपरी निर्मळ येथील टोलनाक्यावर जात तेथील व्यवस्थापकाला बोलावून रस्ता जोपर्यंत दुरूस्त होत नाही तोपर्यंत टोल बंद करा टोल वसूल करू नका, अशा सूचना करत स्वतः खा. लोखंडे यांनी टोल वसूल करणार्‍या बूथला कुलूप लावले. यावेळी जागतिक बँक प्रकल्प अधिकारीही येथे उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!