शिवसनेच्या सह्या घेण्याचे काम सुरु; मातोश्री परिसरात झळकले ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री’चे फलक
Share

मुंबई : वृत्तसंस्था
भाजपने सत्ता स्थापनेसाठी असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या गोटात सत्तास्थापणेसाठी हालचालींना वेग आला आहे. आज सकाळी शिवसेनेकडून आमदारांच्या सह्या घ्यायला प्रारंभ करण्यात आला होता. सेनेची महत्वपूर्ण बैठक मुंबईत सुरु असून या बैठकीनंतर सेनेकडून मुख्यमंत्रीपदावर शिक्का मोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे मातोश्री परिसरात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री याबाबतचे फलक सध्या दिसून आले आहेत.
जर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अस समीकरण होत असेल तर सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला तसे पत्र राज्यपाल यांना द्यावे लागणार आहे. काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल त्यासाठी शिवसेनेने सर्व आमदार आणि अपक्ष यांच्या सह्या घेतल्या आहेत.
शिवसेनेकडे 56 आमदार आहेत. तर आठ अपक्षांचा पाठिंबा मिळून 64 असे शिवसेनेच संख्याबळ आहे. मात्र सत्ता स्थापनेसाठी 145 जागा आवश्यक आहे. आता सत्ता स्थापनेत शिवसेना कोणाची मदत घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले.
राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे तर विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे.
संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर आहे. सोशल मीडियात सत्तास्थापणेवरून पोस्ट केल्या जात आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी, कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचा समाचारदेखील नेटकरी घेताना दिसून येत आहेत.