Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

सेनेला ‘सोनिया’चा दिनू

Share

उद्या उशिरापर्यंत सत्ता स्थापनेची घोषणा : काँग्रेस

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत. काँग्रेस नेत्यांनी काल बुधवारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यावर त्यांनी शिवसेनेसोबत जाण्यास संमती दर्शवली. त्यानंतर पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात तोडगा काढण्यात आला. त्यानंतर गुरुवारी पुन्हा बैठक होणार असून शुक्रवारी शिवसेनेशी चर्चा करुन रात्री उशिरापर्यंत सत्ता स्थापनेची घोषणा केली जाईल असे काँग्रेसनेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे आता लवकरच राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होणार आहे.

सोनिया गांधींशी चर्चेनंतर काल बुधवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक सुरू झाली. या बैठकीला स्वत: पवारही उपस्थित होते. त्याशिवाय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश, के.सी. वेणूगोपाल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, नवाब मलिक आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाच्यादृष्टीने या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. किमान समान कार्यक्रम, त्याची अंमलबजावणी, सत्तास्थापनेतील अडथळे अशा सर्वांगीण बाजू या बैठकीत चर्चिल्या गेल्या. सुमारे तीन तास खलबतं झाली.

या बैठकीनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्रामध्ये गेल्या 21 दिवसांपासून जी अस्थिरता चालली आहे. ती संपवण्याकरिता आणि राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली मात्र अजूनही चर्चा सुरु आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
महाराष्ट्रात स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन होईल, आणि गेल्या काही दिवसातील अस्थिरता संपुष्टात येईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेसोबत चर्चा कधी करणार? असे पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, सर्व घडामोडींवर चर्चा सुरु आहे, त्या निश्चित झाल्यानंतर आपल्याला माहिती दिली जाईल.

महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय पर्यायी सरकार स्थापन होऊ शकत नाही, आम्ही लवकरच स्थिर आणि पर्यायी सरकार देऊ, सरकारबाबत चर्चा सकारात्मक सुरु आहे, असे नवाब मलिक म्हणाले. त्यानंतर लगेचच संजय राऊत यांनी माध्यमांकडे शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस आघाडीच्या बैठकीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. बैठकीबाबत जी माहिती माझ्याकडे येत आहे ती मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवत आहे. काँग्रेस आघाडीची बैठक संपल्यानंतर मी शरद पवार यांची भेट घेणार आहे. तिथून उद्धव ठाकरे यांच्याशीही संपर्क साधणार आहे. तसं आमचं बोलणं झालं आहे, असेही राऊत यांनी पुढे नमूद केले.

आता चर्चा फार लांबू नये, हे सगळ्यांचंच मत आहे. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रदीर्घ बैठक होत आहे, असे नमूद करताना महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू असल्याने कायदेशीर प्रक्रियेतूनच जावे लागणार आहे. प्रथम तिन्ही पक्षांना राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करावा लागणार आहे. त्यानंतर राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची प्रक्रिया होईल व आम्हाला सत्तास्थापनेचं निमंत्रण मिळेल. या सगळ्या प्रक्रियात दोन-चार-पाच दिवसांचा कालावधी जाऊ शकतो, असे राऊत यांनी नमूद केले.मुख्यमंत्री कोण हे आताच सांगण्याची गरज नाही. काहीही लपूनछपून होणार नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल आणि तो शिवतीर्थावर शपथ घेईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.काँग्रेसला आम्ही मुख्यमंत्रीपदाचे नाव कळविलेले आहे. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे ही राज्यातील जनतेची इच्छा आहे असे सांगितले.

काँग्रेस नेते आणि माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची दिल्लीत भेट घेतली. संजय राऊत यांच्या घरी ही भेट झाली.

शरद पवारांच्या घरची प्रदीर्घ बैठक झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली आणि त्यांना चर्चेची माहिती दिली. त्यानंतर हे नेते पुन्हा पवारांच्या भेटीला आले आणि त्यांनी सोनिया गांधींचा निरोप पवारांना दिला. त्यानंतर पुन्हा रात्री उशिरापर्यंत पवारांच्या घरी बैठक सुरु होती.

मुख्यमंत्री कोण? हे काँग्रेसला सांगितलंय : शिवसेना
मुख्यमंत्री कोण हे आताच सांगण्याची गरज नाही. काहीही लपूनछपून होणार नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल आणि तो शिवतीर्थावर शपथ घेईल, काँग्रेसला आम्ही मुख्यमंत्रिपदाचे नाव कळविलेले आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची इच्छा असल्याचेही ते म्हणाले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!