‘भारत बंद’ला शिवसेनेचा पाठिंबा नाही ?

0
मुंबई – इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. देशभरात ठिकठिकाणी सत्ताधारी भाजपाविरोधात आंदोलकांकडून निदर्शनं सुरू करण्यात आली आहेत. या बंदला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. तर दुसरीकडे, सत्तेत सहभागी असूनही नेहमी विरोधकांची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेनं मात्र बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.  विरोधकांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला शिवसेनेनं पाठिंबा का दर्शवला नाही,असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

काँग्रेसकडून पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात शिवसेना सहभागी होऊ नये यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन विनवणी केल्याची माहिती मिळत आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीमुळेच शिवसेना बंदमध्ये सहभागी झाली नसल्याची सुत्रांची माहिती आहे.

सत्तेत असूनही नेहमी भाजपाविरोधी आंदोलनात सहभागी असणारी शिवसेना बंदमध्ये सहभागी नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होता. भाजपावर टीका करण्याची एकही संधी न सोडणारी शिवसेना बंदमध्ये सहभागी का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. विशेष म्हणजे शिवसेना बंदमध्ये सहभागी नसताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

LEAVE A REPLY

*