भाजपचे बुडबुडे शिवसेना फोडल्याशिवाय राहणार नाही – खा. संजय राऊत

0
येवला । मुदतपूर्व निवडणुका घ्यायला धाडस लागते. राज्याच्या आगामी विधानसभा निवडणूका लावायच्या कधी हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. सर्वच राजकीय पक्ष तिसर्‍या वर्षानंतर आगामी निवडणुकीची तयारी करतात.

शिवसेनेने विधानसभा व लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असून सन 2014 मधील भाजपचे बुडबुडे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना फोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी दिला.

येवला येथे पत्रकार परिषदेत खा.राऊत म्हणाले की,गेल्या तीन वर्षापूर्वी भाजप केंद्रात व राज्यात सत्तेत आल्यापासूनच या पक्षाचे प्रत्येक निवडणुका लढवणे व जिंकणे हेच ध्येय राहिले आहे.यामुळे विकास कामांकडे भाजपचे लक्ष राहिले नाही.

तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीनेच शरद पवार व काँग्रेस पक्षातील नेते राज्यात सध्या फिरत आहे.सत्तेच्या माध्यमातुन केवळ स्व पक्षाचा विस्तार करण्याचे काम भाजपने आजपावेतो केले आहे. त्यामुळेच शिवसेनाही गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभेची निवडणूक पक्षाच्या विस्तारासाठी लढवणार आहे.

सुरत,बडोदा या परिसरातील सुमारे 40 ते 50 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे खा.राऊत यांनी सांगितले. गुजरातमधील जनता भाजपला दणका दिल्याशिवाय राहणार नाही, याची जाणीव झालेली असल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे संपूर्ण मंत्रीमंडळ गुजरात मध्ये तळ ठोकून आहे.

इतका वेळ, पैसा व यंत्रणा भाजपला स्वत:च्या बालेकिल्ल्यात का खर्ची करावी लागत आहे, याचा विचार भाजपने आता करावयास हवा. गुजरातमधील जनतेच्या मनात काहीतरी वेगळे असल्याचे सांगुन खासदार राऊत यांनी राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराची आता वेळ टळून गेल्याचे सांगितले. मंत्रीमंडळ विस्तार होणार होणार हे आम्ही भाजप सत्तेत आल्यापासूनच ऐकत आलो आहे.

मिंंत्रमंडळ विस्तारावर खरे तर मुख्यमंत्र्यांनी बोलायला पाहिजे. परंतु ते बोलत नाही.भाजप सत्तेत आल्यापासून इडी, सेबी या सारख्या यंत्रणांचा वापर दहशतवादा सारखा करत असून राजकीय विरोधकांचा काटा काढण्यासाठी करीत आल्याचा आरोप खासदार राऊत यांनी यावेळी केला.

यावेळी ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे,शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख सुहास सामंत, माजी आमदार मारोतराव पवार, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*