Friday, May 3, 2024
Homeनगर‘त्यांच्यासाठी’ करोना इष्टापत्तीच !

‘त्यांच्यासाठी’ करोना इष्टापत्तीच !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांसाठी करोना ही आपत्ती नव्हे तर इष्टापत्ती झाली आहे. नगर जिल्ह्यावर करोनाचे संकट गडद होत चालले आहे. रुग्ण व मृतांची संख्या वाढते आहे. त्यामुळे रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे खाजगी डॉक्टरांनी याचा काळाबाजार सुरू केला आहे.

- Advertisement -

करोना ही आंतरराष्ट्रीय आपत्ती असताना नगरमधील ‘खाजगी’ वाले पैसे कमावण्याची संधी मानत आहेत. हा प्रकार म्हणजे प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे असून, गैरमार्गाने पैसे कमावण्याचे धंदे थांबवावेत अन्यथा शिवसेना स्टाईल धडा शिकवला जाईल, असा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी दिला आहे.

करोना काळात गैरप्रकार करणार्‍या डॉक्टरांची मान्यता रद्द करावी व हॉस्पिटलचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी जाधव यांनी आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे, जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंब्बीकर, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना दिले आहे.

जिल्ह्यात करोना रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड सेंटरमध्ये देखील बेड्स उपलब्ध होत नाहीत. त्यात खाजगी वैद्यकीय आस्थापनांनी पॅकेजमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. काही नामांकित हॉस्पिटल्स तर करोना रुग्ण दाखल करून घेताना लाखो रुपये आगाऊ भरून घेत आहेत.

रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांना डॉक्टरांच्या हातपाया पडावे लागते आहे. वास्तविक करोनावर कोणतेही औषध नाही. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाला भीती दाखवून त्याच्याकडून वेगवेगळ्या उपचारासाठी पैसे घेतले जात आहेत. असेच सुरू राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, अनागोंदी होईल.

करोनाचा कहर लोकांच्या जीवावर बेतल्यास लोक कायदा हातात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गैर प्रकारांना वेळीच आळा घालावा, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या