Type to search

Featured सार्वमत

अभियंत्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी

Share

शिवसेना नेत्यांची मागणी : माहिती मागविल्यामुळे महापालिका अभियंत्यांमध्ये घबराट

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेतील अभियंत्यांच्या मालमत्तेची चौकशी होण्याची गरज आहे. या संदर्भात माहिती मागविली असून, ती आल्यानंतर लोकायुक्तांकडे या संदर्भात मागणी करण्यात येणार आहे. अभियंते स्वच्छ असतील तर त्यांनी घाबरून जाऊ नये. आयुक्तांकडे संरक्षणाची मागणी करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा घणाघात शिवसेनेने केला आहे. वर्धापन दिनानिमित्त बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी महापालिकेतील अभियंत्यांबाबत आपला संताप व्यक्त केला. महापालिकेतील अभियंत्यांनी दोन दिवसांपूर्वी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची भेट घेऊन संरक्षणाची मागणी केली आहे. आम्हाला चुकीच्या प्रकरणात अडकविण्याची शक्यता असून, त्यासाठी माहिती मागविली जात असल्याचे म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने अभियंत्यांवर जोरदार प्रहार केला आहे. ते म्हणाले, आजपर्यंत केलेल्या चुकीच्या कामांची माहिती आता पुढे येण्याची भीती अभियंत्यांना वाटत आहे. ते जर स्वच्छ असतील तर मागितलेल्या माहितीची भीती त्यांना वाटायला नको.

विद्युत घोटाळ्यातही प्रमुख अभियंत्यांला सोडून इतरांना दोषी धरण्यात आले. सध्याचे प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के यांनी वैद्यकीय कारण दाखवून आणि पोलिसांशी हितसंबंध प्रस्थापित करून आपले नाव या गुन्ह्यातून वगळले. त्यासाठी एका ठेकेदाराने पोलिसांशी आर्थिक व्यवहार केला. अनेक अभियंते वर्षानुवर्षे एकाच जागेवर कार्यरत आहेत. तेथे त्यांनी कुरण तयार केले. बदली करण्याचा प्रयत्न झाल्यास राजकीय हस्तक्षेप केला जातो. नगररचना विभागातील अभियंता कल्याण बल्लाळ यांची विद्युत विभागात बदली करण्यात आली. त्यांनी काम करणेच सोडून दिल्याने आज शहरातील अर्ध्याच्यावर पथदिवे बंद आहेत. त्यांच्याकडे पुन्हा नगररचना विभागाचा काही कार्यभार देण्यात आला. यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शिफारस केली. आर्थिक तडजोडीतून हा प्रकार झाल्याचा आरोप बोराटे यांनी केला.

मागविलेल्या माहितीत बर्‍याच गंभीर बाबी समोर येऊ लागल्याने अभियंते घाबरलेले आहेत. बूट फेक आंदोलन झाल्यानंतर या अभियंत्यांचे कोणत्या राजकीय नेत्यांशी संभाषण झाले, त्याचे फोन कॉल उपलब्ध करण्याची मागणी न्यायालयात करण्यात येणार आहे. यात कोणत्या नेत्याचे हात आहेत, हे देखील उघडे होईल. महापालिकेचा एक अभियंता कमरेला पिस्तूल लावून फिरत आहे. काही जण जातीचा आधार घेत, ती पदे घेऊन फिरत आहेत. या सर्वांनाच याची उत्तरे द्यावी लागणार असल्याचे या नेत्यांनी निक्षून सांगितले.

एक बॅच 75 रुपयांना!
महापालिका निवडणुकीच्या खर्चाची माहिती अद्याप आमच्याकडे पूर्णतः आलेली नाही. मात्र जी प्लॅस्टिकची खुर्ची पाच रुपये भाड्याने मिळते, ती साडेबारा रुपये भाड्याने घेण्यात आली. कर्मचार्‍यांचे बॅच बाहेर एक रुपयाला तयार करून मिळतात. त्यांनी प्रती बॅचमागे 75 रुपये खर्च दाखविण्यात आला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. महापालिका निवडणुकीत बरीच जबाबदारी अभियंत्यांकडे असल्याने त्यांना या गोष्टीचे उत्तरे द्यावीच लागणार असल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!