Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

पीक विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा एल्गार; आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका – उद्धव ठाकरे

Share

मुंबई – राज्यातील सर्व विमा कंपन्या आणि बँकांना मी हात जोडून विनंती करतो की, आम्हाला आक्रमक व्हायला लावून का. ज्या शेतकर्‍यांना पीकविमा देण्यात आला आहे तसेच ज्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे, त्यांच्या नावांची यादी या कंपन्यांनी आणि बँकांनी पंधरा दिवसांत आपल्या कार्यालयाच्या दरवाजावर लावावीत, अन्यथा हा मोर्चाच बोलेल अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना इशारा दिला आहे.

बीकेसीत शिवसेनेच्या पीकविमा मोर्चाची सांगता झाल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्रावेळी मुंबईसाठी रक्त सांडणार्‍या शेतकर्‍यांशी आम्ही बांधील आहोत. आम्ही ज्यांचे अन्न खातो त्यांच्याशी कधीही गद्दारी करणार नाही, त्यामुळेच या शेतकर्‍यांच्या हक्कासाठी शिवसेनेने मुंबईत हा धडक मोर्चा काढला आहे. जी व्यक्ती माणूस म्हणून जगतेय त्यांचा हा मुद्दा आहे, याला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत, अशा शब्दांत त्यांनी यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली. आम्ही पीकविमा कंपन्यांना जाग यावी यासाठी हा मार्चा काढला आहे. सरकार वारंवार सांगतंय की शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली आहे. बँकाही सांगताहेत की कर्जमाफी देण्यात आली आहे.

कर्जमाफी दिलीय तर त्याचे पैसे गेले कुठे? हे जनतेला कळायला हवे. कारण पीकविमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना लुबाडल्याच्या बँकांकडून कर्जमाफी न मिळाल्याच्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत. त्यामुळेच पीकविमा देणार्‍या कंपन्यांसह कर्जमाफी देणार्‍या बँकांनी 15 दिवसांच्या आत शेतकर्‍यांना न्याय द्यावा, लाभार्थी शेतकर्‍यांच्या नावांची यादी आपल्या दरवाजावर लावावी. ग्रामीण भागातील शिवसैनिकांनी आपल्या गावातील बँकांना ही बाब जाऊन सांगावी. मात्र, असं घडलं नाही तर शांततेत निघालेला हा मोर्चा त्यावेळी बोलेल, असा गर्भित इशाराच उद्धव ठाकरे यांनी यावेळी बँका आणि वीमा कंपन्यांना दिला.

16 व्या दिवशी मोर्चा बोलेल
खासगी विमा कंपन्या आणि बँकांना इशारा देताना उद्धव ठाकरे यांनी निर्वाणीचा इशाराही दिला. दिलेल्या मुदतीप्रमाणे 15 दिवसांत खासगी कंपन्यांनी शेतकर्‍यांची प्रलंबित प्रकरणे निकाली न काढल्यास, तसेच बँकांनीही 15 दिवसांच्या आत पात्र शेतकर्‍यांची कर्जे न माफ केल्यास हा मोर्चाच बोलेल, असा सूचक इशारा उद्धव यांनी मोर्चात दिला.

शिवसेना झोपली होती का?- राजू शेट्टी
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिवसेनेच्या मोर्चावर टीकास्त्र सोडले आहे. शेतकर्‍यांच्या पीक विम्यासंदर्भात शिवसेनेने काढलेला मोर्चा म्हणजे नौटंकी असून शेतकर्‍यांची ही स्थिती येईपर्यंत सत्तेत असलेली शिवसेना झोपली होती का, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

शिवसेनेकडून शेतकर्‍यांची दिशाभूल – जयंत पाटील
पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. आज शिवसेनेमार्फत जो मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये फक्त शिवसैनिक होते. महाराष्ट्रातील शेतकरी कुठे होते ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची पिळवणूक ज्या विमा कंपन्यांनी केली आहे त्यावर तोडगा निघू शकतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. शेतकर्‍यांना दिलासा मिळू शकतो. परंतु सरकारची मर्जी दिसत नाही. दुर्दैवाने सत्तेतील एक पक्ष विरोधी पक्षाची भूमिका घेवून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. नुसता मोर्चा काढून शिवसेनेला हात झटकता येणार नाहीत. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी निर्णय घ्यायचे असतात. रस्त्यावर उतरून मोर्चे काढायचे नसतात हे शिवसेनेला कुणी तरी सांगायची गरज आहे असा टोला यावेळी जयंत पाटील यांनी लगावला.

शिवसेनेने ‘वर्षा’वर मोर्चा काढावा – विजय वडेट्टीवार
एकीकडे सत्ता उपभोगायची आणि पीक विम्यासाठी मोर्चा काढायचा हा शिवसेनेचा दुटप्पीपणा असून त्यांना खरोखर शेतकर्‍यांची चिंता असेल आणि त्यांची हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर मोर्चा काढावा, असे आवाहन विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेला केले. या मोर्चासंबंधी पत्रकारांसोबत संवाद साधतांना ते आपल्या शासकिय निवासस्थानी बोलत होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!