Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपाची मोर्चेबांधणी

Share

अकोले, शिर्डीचे जागावाटप नव्याने  नगरबाबत पालकमंत्र्यांचे कानावर हात

अहमदनगर (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीचे जागावाटपाचे सूत्र पूर्वीप्रमाणे राहिलेले नाही. भाजपचे यावेळी 123 आणि शिवसेनेचे 63 आमदार असल्याने जागा वाटपाबाबत फेरविचार होणार असल्याची माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली. अकोले, शिर्डीचे जागावाटप नव्याने होणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र नगर शहरातील जागा बदलणार का, या प्रश्‍नावर कानावर हात ठेवत ते तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विचारा, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांसाठी आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मैदाने तयार केली जात आहेत. या पार्श्‍वभूमिवर शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपाची मोर्चेबांधणी सुरू झाल्याने याबाबत शिवसेना काय भूमिका घेते याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.  महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस येत्या 25 व 26 ऑगस्टला नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या संदर्भात पक्षाचे आमदार, प्रमुख पदाधिकारी यांचा समावेश असलेल्या कोअर कमिटीची बुधवारी शासकीय विश्रामगृहावर बैठक झाली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी खा. दिलीप गांधी, आ. शिवाजी कर्डिले, आ. मोनिका राजळे, माजी आ. वैभव पिचड, माजी मंत्री बबनराव पाचपुते, महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस 25 ऑगस्टला दुपारी बारा वाजता शिर्डी येथे विमानाने येणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता अकोले येथे जाहीर सभा घेतील. अकोले येथून निघून संगमनेर तालुक्यातील कळस येथे त्यांचे स्वागत होईल.

संगमनेर येथे मालपाणी लॉन्स येथे दुपारी तीन वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर कोल्हार येथे स्वागत. राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ते राहुरी येथे वायएमसीए मैदानावर पाच वाजता जाहीर सभा घेणार आहेत. नगरपासून दोन किलिमोटर अंतरावर त्यांचे एमआयडीसीजवळ जंगी स्वागत करण्यात येईल. तेथून मोटारसायकलच्या रॅलीद्वारे ते गांधी मैदान येथे जाहीर सभेसाठी येतील. या दरम्यान ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

गांधी मैदानात सायंकाळी सात वाजता त्यांची जाहीर सभा होणार असून, त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर त्यांचा मुक्काम असेल. 26 ऑगस्टला सकाळी साडेनऊ वाजता विश्रामगृहावर त्यांची पत्रकार परिषद होणार असून, त्यानंतर ते पाथर्डीच्या दिशेने जातील. या दरम्यान, करंजी, तिसगाव येथे त्यांचे स्वागत होणार आहे. पाथर्डी येथे सकाळी साडेअकरा वाजता मार्केट यार्ड येथे जाहीर सभा होणार आहे. तेथून ते माणिकदौडी, धामणगाव (ता. आष्टी) मार्गे आष्टी येथे जाऊन तेथे सभा घेणार आहेत. आष्टी येथील सभेनंतर जामखेड (जि. नगर) येथे दुपारी चार वाजता बीड रोडवर जाहीर सभा घेणार आहेत. जाहीर सभा आणि स्वागताची तयारी स्थानिक लोकप्रतिनिधी व पक्षाचे पदाधिकरी करणार आहेत. वेळेचे महत्त्व लक्षात घेता कुठे स्वागत करायची परवानगी द्यायची, कुठे नाही, याचे अधिकार कोअर कमिटीला राहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत भाजपचे आ. सुरजितसिंह ठाकूर, श्रीकांत भारती यांच्यासह 160 जणांची टीम आहे. यात्रेला राज्याप्रमाणेच जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास पालकमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

फलक लावणारे भाजपचे नाहीत
शहरातील प्रमुख मार्गांवर ‘देवेंद्र हेच इंद्र, देवाचा अवतार’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. त्याकडे लक्ष वेधले असता, हे फलक कोणी लावले माहीत नाही. ते भाजपने लावलेले नाहीत. फलक लावणारे भाजपचे कार्यकर्ते नाहीत. ज्यांनी लावले, त्यांनीच ते काढून घेतले. फलक लावून पक्षात यायला जमतंय का, असा त्यांचा विचार असेल. जमत नसल्याचे लक्षात आल्यामुळे त्यांनी फलक काढले असतील, असा चिमटाही पालकमंत्री शिंदे यांनी घेतला.

पक्षप्रवेशाबाबत दोन दिवसात निर्णय
जनादेश यात्रेच्यावेळी कोण पक्षात प्रवेश करणार का, असे विचारता अनेकांनी तयारी दर्शविली आहे. मात्र कोणाला घ्यायचे, कोणाला नाही याबाबत अद्याप काही ठरले नाही. दोन दिवस अगोदर ते निश्‍चित होईल. त्यानंतरच तुम्हाला सांगू, असे म्हणून यावर फारसे बोलणे त्यांनी टाळले.

शिवसेनेच्या मतदारसंघात यात्रेनिमित्त जाहीर सभा घेण्यात येत असून, याचे कारण काय, असे विचारता पालकमंत्री शिंदे म्हणाले, भाजप आणि शिवसेना हे दोन स्वतंत्र पक्ष असले तरी विचार एकच आहे. महायुती कायम असून, कोणताही गैरसमज असण्याचे कारण नाही. या दोन्ही यात्रेचा एकमेकांना फायदाच होणार आहे. शिर्डीची जागा कायम शिवसेनेकडे असली, तरी तेथे विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून आलेला नाही. जे निवडून येतात, तेच यावेळी भाजपमध्ये असल्याने ही जागा भाजपकडेच राहून तेच उमेदवार असतील. अकोले आणि नगर हे दोन मतदारसंघ शिवसनेकडे आहेत. जागावाटपाचाबाबत फेरविचार होणार असून त्यामध्ये अकोलेचा विचार नक्की होईल. नगरच्या जागेत बदल होणार की नाही, याबाबत मात्र मुख्यमंत्र्यांनाच विचारा.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!