Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

‘शिवनगरी’ समोर खासगी अ‍ॅपे, रिक्षांचे आव्हान !

Share

शहरातील अंतर्गत वाहतूक सेवा : मागणी जास्त अन् पुरवठा कमी

अहमदनगर (प्रतिनिधी)- दीड-दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नगर शहरात दीपाली ट्रान्सपोर्टची ‘शिवनगरी’ पाचवी शहर बससेवा सुरू झाली आहे. मात्र, ही बससेवा महपालिकेने निर्धारित केलेल्या मार्गावर अद्याप धावू शकलेली नाही. त्यातच सेकंदा सेकंदाला शहरात धावणार्‍या खासगी रिक्षा आणि अ‍ॅपेचे आव्हान या बससेवेसमोर असून त्याला मनपा शहर बससेवा कशी तोंड देणार हा प्रश्न आहे.

दरम्यान मनपाची ‘शिवनगरी’ ही शहरातील अवघ्या चारच मार्गांवर धावत असून अजून निर्धारित असलेल्या पाच मार्गांवर ही बससेवा कधी सुरू होणार? असा प्रश्न नगरकरांना पडला आहे. त्यातच शहराच्या विविध भागांतूनही बससेवा सुरू करण्याच्या मागण्या नगरसेवकांद्वारे मनपा प्रशासनापर्यंत येत आहेत. मात्र, सध्याची शहर बसची स्थिती मागणी जास्त व पुरवठा कमी अशी झाली आहे.

6 जुलैपासून दीपाली ट्रान्सपोर्टद्वारे 10 बसच्या माध्यमातून ‘शिवनगरी’ शहर बससेवा सुरू झाली आहे. पांढर्‍या शुभ्र व नव्या कोर्‍या या बसचे आकर्षण नगरकरांना आहे. शहर बससेवा नसल्याने मागील दीड-दोन वर्षांपासून प्रवासी रिक्षा आणि पॅगो चालकांकडून होणारी आर्थिक लूट बंद झाल्याच्या आनंदात नगरकरांकडून शहर बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बहुतांश गाड्या भरभरून प्रवासी वाहतूक करीत आहेत. प्रवासी मंडळीही या सेवेतून खूष असल्याने अनेक ठिकाणाहून नव्याने बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे; पण पुरेशा बस उपलब्ध नसल्याने व आहे त्याच बसद्वारे केवळ चार मार्गांवरच बससेवा चालवणे शक्य असल्याने नव्या मागण्यांबाबतचे प्रस्ताव विचाराधीन ठेवले गेले आहेत.

सध्या शिवनगरी बससेवेद्वारे माळीवाडा जुने बसस्थानक ते निंबळक, विळद घाट अभियांत्रिकी महाविद्यालय, निर्मलनगर व शाहूनगर (केडगाव) अशा चार मार्गांवरच प्रवासी फेर्‍या मारत आहे. मनपाने बससेवा करार करताना शहरातील किमान नऊ मार्गांवर बससेवा सुरू करण्याचे संबंधित ट्रान्सपोर्टला बजावले आहे. पण बसची पुरेशी उपलब्धता नसल्याने अजून आलमगीर (भिंगार), शिवाजीनगर (केडगाव), तारकपूर-मनपा ते निर्मलनगर, एमआयडीसी व व्हीआरडीई या पाच मार्गार्ंंवर बससेवा सुरू नाही. यामुळे या पाच मार्गावर तातडीने बससेवा सुरू करण्याची मागणी नगरकरांकडून होत आहे.

याठिकाणीही मागणी
मनपा हद्दीतील सावेडीतील तपोवन रोड, ढवणवस्ती, पवननगर, बोल्हेगाव-गांधीनगर,कल्याण रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, मुकुंदनगर भागात बससेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. या नव्या मार्गांबाबत मनपा प्रशासनाने प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी स्थायी समितीकडे पाठवला आहे. मात्र, आधीच्या मार्गावर शिवनगरी पोहचलेली नसताना नव्या मार्गावर ती कधी धावणार हे सांगणे आतातरी अवघड आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!