संगमनेरच्या दुर्गभटक्यांनी अनुभवली शिवशाही सफर

0

75 गिरिप्रेमींची त्रिंगलवाडी व कावनई किल्ल्यांना भेट

संगमनेर (प्रतिनिधी) – शिवरायांच्या प्रचंड पराक्रमाची ऊर्जा विखुरलेले स्त्रोत म्हणजे महाराष्ट्रातील गडकोट. या गडकोटांवर जाऊन तेथील मराठ्यांच्या पराक्रमाची पायधूळ भाळी लावणे म्हणजे साक्षात शिवशाहीची अनुभूती घेण्यासारखेच. नाशकातल्या इगतपुरी तालुक्यातून सह्याद्रीची एक रांग पश्‍चिमेकडे विस्तारलेली आहे.
याच रांगेत वसलेले छोटेखानी आकाराचे गिरिदुर्ग म्हणजे त्रिंगलवाडी, बळवंत आणि कावनई. संगमनेरातील दुर्गभटक्यांनी यातील त्रिंगलवाडी व कावनई या दोन्ही किल्ल्यांना एकाच दिवशी सर करीत पौराणिक कालखंडापासून ते आजवरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंतच्या काळात अत्यंत महत्त्व प्राप्त असलेल्या या ठिकाणांची सङ्गर अनुभवली.
त्रिंगलवाडी आणि कावनई हा परिसर तसा मोगलांच्या अखत्यारीतला. सन 1672 च्या सुमारास शिवरायांनी स्वराज्याच्या सीमा विस्तारण्याच्या हेतूने या परिसरातील सर्व गड-कोट स्वराज्यात दाखल करण्याची योजना आखली. मोरोपंत पेशव्यांनी त्यांच्या या योजनेला मूर्तस्वरुप दिले आणि त्यानंतर सुमारे 17 वर्षे हे किल्ले स्वराज्याचे शिलेदार म्हणून अंगावर भगवाध्वज ङ्गडकावीत ताठ मानेने मराठ्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार बनले.
तासदीड तासाच्या साधारण चढाईच्या त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याला जैन लेण्या असलेली गुंङ्गा आहे. तीन भागांत असलेल्या या देखण्या आणि अत्यंत सुबक कोरीवकाम असलेल्या गुंङ्गेचे प्रवेशद्वार अत्यंत कोरीव नक्षीकामाने सजलेले आहे. अंतरंगातील कोनाडे, खांब, छत इतक्या सुबक नक्षीकामांनी सजलेले आहेत, की पाहणारा त्यात दंग होऊन जावा.
गुंङ्गेच्या अंतिम चरणातील विहारात गौतमबुद्धांची ध्यानस्थ प्रतिमा या लेण्यांचे सौंदर्य शतपटीने वाढवते. पुढे सरळ चढाई करुन येणारा पश्‍चिमी कोकण दरवाजा, दोन डोंगरांच्या मधून छिन्नी-हातोड्याच्या घावाने काय साधले जाते याचे उत्तम उदाहरण देणारा आहे. आटोपशीर गडमाथा आणि त्यावरून घडणारे आसपासच्या परिसराचे दर्शन दुर्गप्रेमींना सुखावणारे ठरते.
याच धारेत त्रिंगलवाडीपासून 12 किलो मीटरवर असलेला कावनई किल्ला तर अगदी महादेव-पार्वतीच्या वावराने पुलकीत झालेला अर्थातच पौराणिक कथांपासून चर्चेत असणारा गड. 11 लाख 32 हजार वर्षांपासून येथील कपिलधारा कुंडाच्या भोवती सिंहस्थ भरतो. म्हणजेच नाशकातल्या रामकुंडावर दर बारा वर्षांनी भरणार्‍या सिंहस्थाचे मूळस्थान म्हणजे कावनईची कपिलधारा.
सन 1770 च्या सुमारास पेशव्यांनी कपिलतीर्थावरुन रामकुंडावर सिंहस्थ हलविला आणि तेव्हापासून नाशिक शहरात कुंभमेळा भरू लागला. मात्र आजही दर बारा वर्षांनी भरणार्‍या सिंहस्थाचे महत्त्व कावनईतली पर्वणी साधल्याशिवाय पूर्ण होत नाही. प्रभू रामचंद्राचा वावरही येथे होता, हनुमानाने प्रत्यक्ष या परिसरात वास्तव्य केले, छत्रपती शिवरायांचा पदस्पर्शही येथे झाला.
गावोगावी हनुमानाच्या मूर्ती स्थापाव्यात हा समर्थ रामदासांचा उपदेशही महाराजांना येथेच देण्यात आला. शेगावीचे संत गजानन महाराज येथेच बारा वर्षे तपश्‍चर्येत लीन झाले होते. ट्रेक शिखरची ही दुर्गमोहीम संगमनेरच्या 75 दुर्गप्रेमींनी यशस्वी केली. या मोहिमेत अगदी तीन वर्षांच्या लहान मुलापासून अगदी 60 वर्षांच्या वयस्कर काकांपर्यंतची मंडळी सहभागी झाली होती.
महिला आणि मुलींची संख्या दुर्गभटकंतीचे वाढते वेड दर्शवणारी होती. ही मोहीम ङ्गत्ते करणारी मंडळी जेव्हा कावनईच्या कपिलाश्रमात विसावली. तेव्हा प्रत्येकाच्या चेहर्‍यावर शिवशाही अनुभवल्याचे समाधान ओथंबून नितळतांना दिसत होते. प्रवीण कुलकर्णी, मनोज साकी, बाबा थेटे, श्याम तिवारी आदी मंडळींनी ट्रेक शिखरच्या मोहिमेचे नेतृत्व केले.

अलीकडच्या काळात भटकंती हा विषय अनेकांच्या आवडीचा ठरला आहे. सुट्टीचा दिवस हुडकून, चार-दोन भटके सोबतीला मिळाले की काहीजण आसपासच्या डोंगरांचा परिसर पायाखाली तुडवायला जणू आतुरलेले असतात. काहींना मात्र सोबत मिळत नाही, डोंगर म्हटलं की कोणी यायला तयार होत नाही. अशा वेगवेगळ्या कारणांनी त्यांना आपल्या आवडीला मुरड घालावी लागते. संगमनेरातील भटक्यांचा ट्रेक शिखर ही संस्था मात्र अशा मंडळींसाठी दरवर्षी भटकंती माहिमेचे आयोजन करीत असते आणि त्यात संगमनेरातील बरीच मंडळी अगदी उत्साहाने सहभागी होत असते. गेल्या आठ/दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या भटकंती मोहिमेने यंदा संगमनेरातील 75 गिरिप्रेमींना नाशिक जिल्ह्यातील त्रिंगलवाडी व कावनई किल्ल्याची सङ्गर घडविली.

LEAVE A REPLY

*