Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शिरवाडे येथे आगीत ऊस व द्राक्षबाग जळून खाक

Share

शिरवाडे वाकद | (वार्ताहर)

येथे आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास विद्युत ट्रान्सफार्मरवर शॉर्टसर्किट होऊन ऊस व द्राक्षे बागेचे जळून नुकसान झाले.

येथील गोरक्षनाथ मंदिराजवळील विद्युत ट्रान्सफार्मरवरील पिनइन्सुलेटरमधून तार तुटून खाली पडली. यामुळे शॉर्टसर्किट होऊन ट्रान्सफार्मरच्या ऑइलने पेट घेतला.

या घटनेत किसन नामदेव आवारे यांच्या गट नंबर ८० मधील उसाने पेट घेतला. परिसरातील सुमारे १०० अबालवृद्धांनी उसाच्या बांड्या तसेच झाडांच्या फांद्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तसेच वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले.

त्यामुळे २० आर ऊस जळून खाक झाला. उसाच्या शेजारीच शिवाजी नामदेव आवारे यांनी द्राक्षेबागेला पाणीटंचाईमुळे पाचटाचे आच्छादन केले होते. पाचटाने अचानक पेट घेतल्यामुळे द्राक्षे बागेसही आग लागली.

त्यात द्राक्षवेलींचे सुमारे २०० झाडे, ठिबकसिंचन व पाईपलाईन जळून खाक झाली. या परिसरात मोठी लोकवस्ती असून जवळपास सर्वांनीच चारा साठवणूक केली आहे.

नागरिकांनी आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच वाकदचे कनिष्ठ अभियंता ए. टी. पाटील, तारतंत्री दिपक जाधव, कामगार तलाठी नंदकिशोर गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

शिवाजी आवारे यांनी आर्थिक परिस्थिती तसेच पाणीटंचाईवर मात करून नवीनच द्राक्षबाग फुलवली असून त्यांचे या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे व किसन आवारे यांचे साठ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी माजी सरपंच बाळासाहेब आवारे, साहेबराव तनपुरे, भाऊसाहेब आवारे, सरपंच सुरेखा चिताळकर, संदीप आवारे, रामनाथ तनपुरे आदींनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!