वाहतूक पोलिसांकडून शिर्डीत साईभक्तांची लूट

0
शिर्डी (प्रतिनिधी) – शिर्डी वाहतूक शाखेकडून साईभक्तांना नागविण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी खा. लोखंडे शिर्डीतून जात असताना पोलिसांकडून साईभक्तांची वाहने अडवून उकळण्याचा प्रकार सुरू होता. खा. लोखंडे यांनी तेथे थांबून माहिती घेतली असता वाहतूक पोलीस पैशासाठीच साईभक्तांना त्रास देत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर खा. लोखंडे यांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांची कानउघाडणी करत जिल्हापोलीस प्रमुखांबरोबर संपर्क साधून याबाबत विचारणा केली. साईभक्तांना त्रास द्याल तर याद राखा असा सज्जड दमही खा. लोखंडे यांनी यावेळी दिला.
साईसमाधी शताब्दी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. शिर्डीत भक्तांच्या सुखसुविधांना अद्यापही अभाव आहे. त्यातच शिर्डीत येणार्‍या साईभक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बाहेरून येणार्‍या साईभक्ताला शिर्डीत प्रवेश करताच वाहतूक पोलिसांच्या जाचाला सामोरे जावे लागते. बाहेरच्या पासिंगच्या गाड्या आडवून शिर्डी वाहतूक पोलीस मनमानी पध्दतीने साईभक्तांकडून पैसे उकळतात.
एखाद्या भक्ताने पैसे देण्यास टाळाटाळ केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे शिर्डीत येणारा साईभक्त त्रस्त झाला आहे. याबाबत काही भक्तांच्या खा. सदाशिव लोखंडे यांच्याकडे तक्रारी आल्या. शहानिशा करण्यासाठी खा. लोखंडे शिर्डीत आले असता वाहतूक शाखेकडून वाहने अडवून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू होता. तेथे थांबून त्यांनी माहिती घेतली असता साईभक्तांच्या वाहनांना अडवून ड्रेस कोड, सीट बेल्ट आदी कारणांवरुन पोलीस हजाराच्या पटीत पैसे वसूल करत असल्याचे त्यांनी पाहिल्यानंतर खा. लोखंडे चांगलेच संतापले.
त्यांनी पो.नि. दौलत जाधव यांना जाब विचारत शिर्डीत येणार्‍या साईभक्तांच्या जिवावरच शिर्डीतील अर्थव्यवस्था टिकून आहे. त्यांनाच तुम्ही त्रास देता. वाहतूक शाखेचा फक्त पैसे कमाविण्यचाच हेतू आहे का? असा सवाल करत यापुढे साईभक्तांना त्रास दिल्यास शिवसेना स्टाईल उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला.
जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी जाधव यांना धारेवर धरत एकीकडे पावत्या फाडण्याचा सपाटा लावला तर दुसरीकडे रस्त्यावर वाहतुक कोंडी होते. पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी दाखवुन दिले. आगामी काळात साईसमाधी सोहळ्यात शिर्डीत येणार्‍या साईभक्तांना त्रास झाल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे असा ईशारा दिला. यावेळी तालुकाप्रमुख कमलाकर कोते, शहरप्रमुख सचिन कोते, उपजिल्हाप्रमुख नाना बावके, माजी शहरप्रमुख संजय शिंदे, विजयराव काळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*